‘फडणवीस यांचा राज्यात अस्थिरता पसरवण्याचा कट’

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 ,21 मे 2020 :-  राज्य कोरोनाच्या संकटात आहे. परंतु भाजपाला याचे सोयरसुतक नाही. भाजपला या कठीण प्रसंगात राजकारण सुचत आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्यासह दिल्ली आणि राज्यातील काही नेते एकत्र मिळून महाराष्ट्रातील सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहेत. असा आरोप काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केला.

एका वाहिनीला मुलाखत देताना आ.थोरात बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार आगपाखड केली. बाळासाहेब थोरात यांनी म्हटले की, राज्य कोरोनाच्या संकटात असताना भाजपला राजकारण सुचत आहे.

सुब्रमण्यम स्वामी यांनी उद्धव ठाकरे यांना महाविकासआघाडीतून बाहेर पडण्याचा दिलेला सल्ला या कटाचा भाग असल्याचा दावा थोरात यांनी केला. एकीकडे भाजपचे नेते राजकारण करायचे नाही, म्हणून सांगतात.

पण देवेंद्र फडणवीस यांच्यासह दिल्ली आणि राज्यातील काही नेते सातत्याने सरकार अडचणीत कसे येईल, हे पाहत आहेत. सरकार अस्थिर करण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु आहेत.

आज राज्यावर संकट आले असताना त्याला सामोरे जायचे सोडून भाजप राजकारण करु पाहत आहे. भाजपची कृती ही महाराष्ट्रद्रोही आहे. ‘महाराष्ट्र बचाव’ नव्हे तर ‘भाजप बचाव’ अशी त्यांची भूमिका असल्याची टीका थोरात यांनी केली.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

अहमदनगर लाईव्ह 24