Maharashtra News : देवेंद्र फडणवीस यांनी मराठा व ओबीसींमध्ये झुंज लावण्याचे काम केले आहे. मराठ्यांना आरक्षण देणारच, अशी भूमिक घेणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,
ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण नकोच, असे म्हणणारे छगन भुजबळ दोन्ही मांडीवर घेणारे फडणवीस ओबीसींची बाजू कशी सांभाळणार आहेत.
पक्षाची फोडाफोडी करून सत्ता लाटायची आणि ओबीसी – मराठा अशी झुंज लावून सामाजिक वातावरण अस्थिर करणाऱ्यांना जनतेने घरी बसविले पाहिजे, अशी अपेक्षा शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा आंधारे यांनी व्यक्त केली.
येथील अजंठा चौकात झालेल्या जाहीर सभेत अंधारे बोलत होत्या. मातृतीर्थ ते शिवतिर्थ यात्रेच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजेंद्र दळवी होते. या वेळी तालुकाप्रमुख भगवानराव दराडे, नवनाथ चव्हाण, शिवशंकर राजळे,
बाबासाहेब ढाकणे, भाऊसाहबे धस, नवनाथ उगलमुगले, केशव खेडकर, अशोक जाधव, राकेश विभुते, ज्योती जेधे, सविता भापकर, रत्नमाला उदमले उपस्थित होते. या वेळी बोलताना अंधारे म्हणाल्या, इडी व निवडणूक आयुक्त कार्यालय हाताशी धरुन भाजपाने सुडाचे राजकारण केले.
भाजपा नेते घडविण्यात अपयशी ठरल्याने उचलेगिरी करुन इतर पक्षांतील नेते आयात केले आहेत. शिवसेना व राष्ट्रवादी पक्ष फोडला, आता काँग्रेसलाही सुरुंग लावला आहे.
पहिली दहा मंत्रीपदे शिंदे गटाला दिले. नंतर १० मंत्रीपदे अजित पवार गटाला दिले, आता राहिलेली मंत्रीपदे अशोक चव्हाणांसोबत येणाऱ्यांना दिले जातील.
मूळ भाजपाला काहीच मिळणार नाही. ज्यांनी भाजप वाढविले, त्यांचे काय? पंकजा मुंडे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळेयांना देवेंद्र फडणवीस यांनी कसे वागविले आहे. यांना घटनाच बदलायची आहे. हुकूमशाही आणायची आहे.
जनतेने विचार करून मतदान करावे. पंकजा मुंडे यांना बाजूला करण्याचे पाप फडणवीसांनी केले आहे. आता अशोक चव्हाणांना राज्यसभेवर घेतील, पंकजा मुंडे यांना तिकीट मिळणार नाही, असे अंधारे म्हणाल्या.
डॉ. बाबासाहबे आबेंडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर अंधारे यांची मिरवणूक काढण्यात आली. प्रास्ताविक भगवानराव दराडे यांनी केले. सूत्रसंचालन सुकदेव मर्दाने यांनी केले. नंदकुमार डाळिंबकर यांनी आभार मानले.