पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी हतबल

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,16 सप्टेंबर 2020 :-  पावसाने उद्ध्वस्त झालेल्या पिकांचा पंचनामा करण्याच्या मागणीची अद्याप दखल घेतली गेली नसल्याने तालुक्यातील म्हैसगाव, आग्रेवाडी, शेरी चिखलठाण परिसरातील शेतकऱ्यांमध्ये प्रशासनाच्या दुर्लक्षित कारभाराबाबत संताप व्यक्त केला जात आहे.

राहुरी तालुक्यातील पश्चिम भागातील म्हैसगाव, आग्रेवाडी, शेरी चिखलठाण परिसरातील शेतक-यांवर ही दुदैवी वेळ आली आहे. सोमवारी (७ सप्टेंबर) रात्रभर झालेल्या मुसळधार पावसाने या परिसराला झोडपल्याने शेतातील उभी पिके आडवी झाली आहेत.

पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात शेतात साचून असल्याने ऊस, मका, कपाशी, बाजरी ही हातातोंडाशी आलेली पिके नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. यंदा पाण्याची परिस्थिती चांगली असल्याने तालुक्यातील म्हैसगाव, आग्रेवाडी, शेरी चिखलठाण सह पश्चिम भागात ऊस, कपाशी, बाजरी, मका या पिकांच्या लागवडी झाल्या आहेत.

मात्र पावसाच्या फटकाऱ्यात होत्याचे नव्हते झाले आहे. या वर्षीच्या गळीत हंगामासाठी तुटून जाणाऱ्या उसाचे पिक देखील पाण्यात गेल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसामुळे कपाशी पिकाच्या कैऱ्या गळून पडल्या आहेत.

मका, बाजरीची पिके देखील भुईसपाट झाल्याने या भागातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करावेत या मागणीचे निवेदन आठवडेभरापूर्वी महसूल प्रशासनाला दिले असताना अद्याप कुणीही नुकसानग्रस्त भागाकडे फिरकले नसल्याचे शेतकऱ्यांनी म्हटले आहे.

मागील वर्षी या भागात झालेल्या ढगफुटीमुळे उभी पिके मातीसह वाहुन गेल्याची भयंकर घटना घडली होती.या पाठोपाठ यंदा मुसळधार पावसाने उभी पिके नष्ट झाल्याने या भागातील शेतकरी हतबल झाला आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24