महाराष्ट्र

शेतकऱ्यांना लागले मान्सूनचे वेध ! पाऊस नसल्याने ग्रामीण व शहरी भागातील व्यवहार ठप्प

Published by
Ahmednagarlive24 Office

Maharashtra News : नुकतेच विविध भागात अवकाळी पावसाचे आगमन झाले असले तरी, शेतकऱ्यांना प्रमुख आधार असलेला मान्सूनचे वेध लागले आहे. तर दुसरीकडे लोकशाहीचा चालू असलेल्या मतदान उत्सवाचे ४ जून रोजी निकाल लागणार असल्याने शेतकऱ्यांना पावसाची ओढ तर कार्यकर्ते, पुढाऱ्यांना निकालाचे वेध, असे संमिश्र चित्र प्रत्येक ठिकाणी पाहण्यास मिळत आहे.

आजमितीस अस्मानी व सुलतानी याच्या वक्रदृष्टीस सापडलेला बळीराजा अर्धमेला झाला आहे. मागील आठवड्या पासून अवकाळीने बहुतेक शेतकऱ्यांची अवकळा केली. त्यात वर्षभराचे आर्थिक नियोजन असणारा खरीप हंगाम तोंडावर आल्याने शेती मशागतीची कामे पूर्णत्वास करण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड चालू आहे. कडक उन्हाच्या तडाख्याने पाण्याचे स्रोत केव्हाच आटले आहे.

परिणामी पशुधनाचा चारा, पिण्याचे पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यात विविध हवामान खात्याने व तज्ज्ञांनी मान्सून वेळेवर व समाधानकारक असल्याचे भाकीत केल्याने बळीराज्याच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. त्यासाठी उसनवारी, दाग-दागिने मोडतोड करून खरीप हंगाम यशस्वी होण्यासाठी मान्सूनची वाट पाहत आहेत.

तर दुसरीकडे लोकसभेचा बिगुल वाजल्यापासून रखरखत्या उन्हात राजकीय वातावरण गरम करून ज्या-ज्या भागात लोकसभा मतदान पार पडले. तेथे झालेल्या मतदान टक्केवारीनुसार आकडे मोड करून आपला नेता सरस ठरणार याची चर्चा झडत आहे. राजकीय कार्यकर्ते, पुढारी आपल्या नेत्यासाठी केलेल्या कामाचे सार होण्यासाठी ४ जूनच्या निकालाकडे टक लावून पाहत आहे.

एकंदरीतच बळीराजाला आपल्या काळीआईची कूस भरविण्यासाठी जोरदार मान्सूनच्या पावसाची तहान लागली असल्याने पावसाची ओढ तर, कार्यकर्ते, पुढारी यांना आपण केलेल्या राजकीय धावपळीत आपला नेत्यांनी बाजी मारावी हे ऐकण्यासाठी निकालाची तारीख असलेल्या ५ जूनचे वेध लागले आहे.

दरम्यान, निवडणूकीचा निकाल लागेल तेव्हा लागेल, सरकार ही स्थापन होईल. परंतु पुरेसा पाऊसच नसल्याने ग्रामीण व शहरी भागातील व्यवहार ठप्प झाले आहे. त्याच्या थेट परिणाम अर्थक्रातीवर होत असल्याने, छोटे-मोठे व्यवसायिक कमालीचे हतबल झाले असल्याने मान्सूनच्या चांगल्या पावसाची प्रत्येक नागरिक वाट पाहत आहे.

Ahmednagarlive24 Office