महाराष्ट्र

Water Storage : भूजल पातळी खालावल्याने शेतकरी चिंतेत

Published by
Ahmednagarlive24 Office

Water Storage : उष्णतेचा वाढता पारा, सोबत मागील वर्षी पडलेले अल्प पर्जन्यमान व दोन पावसातील पडलेला जास्त कालखंड परिणामी भूजल पातळीने जानेवारीपासूनच घसरण्यास सुरवात झाली होती.

आजमितीस बहुतेक विहिरींनी तळ गाठला आहे. उपसा वाढल्याने भुजल पातळी खालावली असून, जनावरांच्या पिण्याचे पाणी व हिरवा चारा यांचा प्रश्न जटील होण्याची शक्यता आहे.

मागील वर्षी अत्यल्प प्रमाण पाऊस पडल्याने खरीप व रब्बी दोन्ही हंगाम सपशेल फेल गेले. थोड्याफार झालेल्या पावसात नियमितता नसल्याने दोन पावसाच्या कालखंडात २१ दिवसापेक्षा जास्त काळ राहिला. परिणामी उपलब्ध झालेल्या विहिरीतील पाण्याचा उपसा शेतकऱ्यांना करावा लागला.

त्यामुळे भूजल पातळीचा सुरुवातीपासूनच समतोल राहिला नसल्याचे मत जाणकार शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे. आता तर कडक उन्हाळ्याची सुरुवात झाली आहे. मार्चमधल्या पहिल्याच आठवड्यात उन्हाचे चटके व त्याची दाहकता दिसण्यास सुरवात झाली.

जेमतेम राहिलेले पाणी रोज उपसणे गरजेचे झाले आहे; मात्र जमिनीत वाटर लेव्हल नसल्याने अपेक्षीत पाणी दुसऱ्या दिवशी येत नाही. परिणामी आता जनावरांना पिण्याचे पाणी व हिरवा चारा याचे भीषण संकट शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर उभे राहणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

चारा छावण्यांसाठी नियोजन व्हावे

पाण्याचा व चाऱ्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीरपणे होणार असल्याने शेतकऱ्यांच्या पशुधनाची हेळसांड होऊ नये म्हणून चारा छावण्यांचे नियोजन करण्यासाठी आतापासूनच प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे.

गावतळे भरून दिल्यास आधार

सध्या शेती व पिण्याचे पाण्याचे आवर्तन चालू झाले आहे. त्यातून गावतळे भरून देण्यासाठी नेते व पुढाऱ्यांनी पुढाकार घेतल्यास त्याचा मोठा आधार शेतकऱ्यांना मिळेल.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office