Maharashtra News : सुरत- हैद्राबाद महामार्गाच्या मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना राहुरीसह राहुरी खूर्द येथील शेतकऱ्यांनी पुन्हा विरोध केला. विरोधाची तीव्रता पाहून अधिकारी शेतकऱ्यांसमोर हतबल झाले. अगोदर गुनांक दोनप्रमाणे भाव जाहीर करावा. तोपर्यंत आम्ही मोजणी होऊ देणार नाही, असा पावित्रा यावेळी शेतकऱ्यांनी घेतला.
दोन वर्षांपासून सुरत- हैद्राबाद या महामार्गासाठी शासनाकडून भूसंपादन करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी याला विरोध केला. त्याच प्रमाणे राहुरी खुदंसह राहुरी येथील शेकडो शेतकऱ्यांनी भूसंपादन प्रकियेला यापूर्वी अनेक वेळा विरोध केला आहे.
त्यामुळे मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना हात हलवत परतावे लागले होते. दरम्यान जिल्हाधिकारी व शेतकऱ्यांची अनेक वेळा बैठक झाली; मात्र बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही.
काल दिनांक १० ऑक्टोबर २०२३ रोजी राहुरी तालुक्यातील गोटूंबे आखाडा, राहुरी खुर्द व मोमीन आखाडा परिसरात एकाच वेळी पोलीस बंदोबस्त घेऊन अधिकारी मोजणीसाठी गेले. यावेळी मोमीन आखाडा परिसरात शेतकऱ्यांनी मोजणीला कडाडून विरोध करत अगोदर गुणांक दोनप्रमाणे भाव जाहीर करावा.
त्या बाबत लेखी द्यावे, असा आग्रह शेतकऱ्यांनी धरला. जोपर्यंत गुणांक दोनप्रमाणे भाव जाहीर करत नाही. तोपर्यंत आम्ही प्रशासनाला कोणत्याही प्रकारे सहकार्य करणार नाही. प्रशासनाने जोर जबरदस्ती केल्यास तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिला.
राहुरी खुर्द येथे तहसीलदार रजपुत यांनी काही शेतकऱ्यांची मोजणी केली; मात्र काही शेतकऱ्यांनी विरोध केला. अशोकराव तोडमल, अण्णासाहेब शेडगे, सुरेशराव तोडमल यांची मोजणी पूर्ण झाली, तर मुकुंद शेडगे, भाऊसाहेब शेडगे, राजू विश्वनाथ शेडगे यांनी मोजणीस विरोध केला.
राहुरी खुर्दसह राहुरी येथील शेतकऱ्यांना प्रांताधिकारी किरण सावंत यांनी शेतकऱ्यांना सहकार्य करुन मोजणी करुन देण्याची विनंती केली; मात्र शेतकरी त्यांच्या निर्णयावर ठाम होते. दुपारी उशिरापर्यंत कोणताच मार्ग निघाला नाही.पोलीस बंदोबस्त घेऊनदेखील अधिकारी शेतकऱ्यांसमोर हतबल झाले होते. शेतकरी रस्त्यावर ठाण मांडून बसले होते.