अहमदनगर Live24 टीम, 6 नोव्हेंबर 2020 :- कोरोनाच्या काळात शेतकऱ्यांबाबत केंद्रातील मोदी सरकारने घेतलेले अन्यायकारक निर्णयाच्या पार्शवभूमीवर आज शेवगाव तालुक्यात जाहिर निदर्शने करण्यात आली.
तसेच यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी सत्तेतील सरकारच्या विरोधात चक्काजाम आंदोलन देखील केले. कोरोना काळात मोदी सरकारने शेतक-यांना मदत करण्याऐवजी त्यांना देशोधडीला लावण्याचे धोरण घेतले आहे.
अतिवृष्टीने झालेली नुकसान भरपाई विम्याच्या जोखीम रकमेइतकी मिळावी, अशी मागणी भाकपचे राज्य सहसचिव अॅड. सुभाष लांडे यांनी केली आहे.
केंद्र सरकार विजेच्या दराबाबत नवे धोरण आणत असून कृषी वापर व व्यापारी वापर यात वीजेचा दर एकच असल्याने ते शेतक-यांसाठी व जनतेसाठी अन्यायकारक ठरणार आहे.
तसेच शेतकरी विरोधी कायद्याच्या विरोधात अनेक महिन्यांपासून शेतकरी संघटना व डावे पक्ष आंदोलन करीत आहेत. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी डावलून कंत्राटी व कार्पोरेट शेतीला फायदा होईल अशी धोरणे केंद्र सरकार राबवित आहे.
याचाच निषेध म्हणून शेतकरी संघटना समन्वय समितीव्दारे आज चक्का जाम आंदोलन करण्यात आले. 26 नोव्हेंबर रोजी देशव्यापी आंदोलन करण्यात येईल असा इशारा अॅड. लांडे यांनी दिला.
या वेळी शशिकांत कुलकर्णी, किसान सभेचे जिल्हा उपाध्यक्ष बापुराव राशिनकर, संजय नांगरे, बाजार समितीचे संचालक अशोक नजन, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय फुंदे आदींनी आंदोलनाचे नेतृत्व केले.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved