मुंबई: ऑक्टोबर-नोव्हेंबर २०१९ मध्ये क्यार व महा चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे झालेल्या अवकाळी पावसाने राज्यातील शेतपिकांच्या झालेल्या नुकसान भरपाईचा दुसरा हप्ता शेतकऱ्यांना लवकरच मिळणार आहे.
त्यापोटी शुक्रवारी राज्याच्या महसूल व वन विभागाने ४ हजार ५०० कोटींच्या निधीला मंजुरी दिली. अवकाळी पावसाने राज्यातील ३४ जिल्ह्यांतील २४९ तालुक्यांतील शेतपिके व बहुवार्षिक पिकांचे मोठे नुकसान झाले होते.
नुकसान भरपाई म्हणून तत्कालीन फडणवीस सरकारने बिगर बागायती पिकांना ८ हजार तर फळबागांना १८ हजार हेक्टरी भरपाई मंजूर केली होती.
कमाल दोन हेक्टरपर्यंत ही भरपाई दिली जाणार आहे. त्यापोटी १८ नोव्हेंबर २०१९ रोजी २ हजार ५९ कोटी रुपये मंजूर केले होते. मात्र नुकसानीची व्याप्ती मोठी आहे. त्यामुळे ती रक्कम अपुरी पडली.
अडचणीत सापडलेला शेतकरी अवकाळीच्या भरपाईकडे डोळे लावून बसला आहे. त्यामुळे सरकारने दुसऱ्या टप्प्यातील ४ हजार ५०० कोटींचा निधी मंजूर केला. हा निधी शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा होणार आहे.
तसेच भरपाईची किमान रक्कम बिगर बागायती पिकांसाठी १ हजार आणि फळबागांसाठी २ हजार असावी, अशी अट घालण्यात आली आहे. या रकमेतून बँकेने कोणत्याही प्रकारची वसुली करू नये, असे बजावण्यात आले आहे.
पिकांचे ३३ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक नुकसान झालेल्यांचे पंचनामे झाले आहेत, अशाच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा होणार आहे. अशा प्रकारे अवकाळीच्या भरपाईचा देय आकडा आता ७ हजार ५९ कोटींवर पोचला आहे.
३३ टक्क्यांपेक्षा कमी नुकसान झालेल्यांना दिलासा दोन हेक्टरच्या मर्यादेमुळे अनेकदा त्यापेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांना नुकसान होऊनही भरपाई मिळत नव्हती. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत होता.
ही बाब लक्षात आल्यामुळे यापुढे किमान एक आणि दोन हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे ३३ टक्क्यांखाली नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना किमान तेवढी मदत मिळणार आहे.