कर्जत :- नगर दक्षिण चे नवनिर्वाचित खासदार डॉ. सुजय विखे यांचा तालुका महायुतीच्या वतीने ३१ मे रोजी कर्जत येथे नागरी सत्कार करण्यात येणार आहे.
या वेळी विविध विकासकामांचा प्रारंभही करण्यात येईल, अशी माहिती भाजपचे तालुकाध्यक्ष अशोक खेडकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे युवानेते रोहित पवार यांनी लक्ष केंद्रित केले आहे. या पार्श्वभूमीवर या सत्कार समारंभाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
बाजारतळावर सायंकाळी पाच वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री राम शिंदे असतील. कर्जत-कोरेगाव रस्त्यावर उभारण्यात येणार असलेल्या उड्डाणपुलाचा,
तसेच गवंडेगल्लीतील रस्त्याच्या कामाचा प्रारंभ पालकमंत्री शिंदे यांच्या हस्ते या वेळी करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाला माजी मंत्री सुरेश धस, भाजप जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गणेश दळवी, रिपाइं जिल्हाध्यक्ष सुनील साळवे, रासप जिल्हाध्यक्ष रवींद्र कोठारी उपस्थित राहणार आहेत.