अहमदनगर Live24 टीम, 4 जानेवारी 2021 :-छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिखाण केल्या प्रकरणी श्री श्री रविशंकर यांच्यावर अद्याप गुन्हा दाखल झाला नाही.
याच्या निषेधार्थ संभाजी ब्रिगेडच्या वतीने ‘श्राद्ध आंदोलन’ करत महाराष्ट्र सरकारचा निषेध करण्यात आला. थेरगाव येथील स्मशानभूमीत विधिवत श्राद्ध घालत संताप व्यक्त केला.
संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष सतिश काळे यांच्या नेतृत्वाखाली हे करण्यात आलेल्या या आंदोलनात संघटक ज्ञानेश्वर लोभे, माऊली बोराटे, योगेश साळवी,
महेश कांबळे, मराठा जोडो अभियानाचे प्रदेश अध्यक्ष नितीन जाधव आदीसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. श्री श्री रविशंकर यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिखाण केले.
तसेच, आपल्या अधिकृत पेज वर व्हिडिओ बनवून छत्रपती शिवाजी महाराज यांची बदनामी केली. शिवप्रेमींच्या भावना दुखावणाऱ्या रविशंकर यांच्यावर कारवाई होणे अपेक्षित होते.
महाविकास आघाडी सरकारकडून कारवाईची अपेक्षा होती मात्र, त्यांनी देखील निराशा केल्याचे सतिश काळे यांनी म्हंटले आहे.
एक वर्ष होऊन देखील गुन्हा दाखल झाला नसल्याने संभाजी ब्रिगेडच्या वतीने हे श्राद्ध आंदोलन करण्यात आले. श्री श्री रविशंकर याच्यावर गुन्हा दाखल न केल्यास आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सतिश काळे यांनी दिला आहे.