अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2021 :- लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याची लातूर जिल्ह्यातील मौजे साकोळ येथे विटंबना झाल्याचा लहुजी शक्ती सेना व मातंग समाजाच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला.
तर या प्रकरणातील समाजकंटक आरोपींना अटक करुन त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करुन कठोर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालय येथे लहुजी शक्ती सेनेचे जिल्हा कार्याध्यक्ष सुनील सकट यांनी दिले.
मौजे साकोळ, शिरुळ आनंतपाळ (जि. लातूर) येथे नुकतीच लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली आहे. राष्ट्रीय महापुरुष हे देशाचे धरोवर असून,
त्यांचा मान सन्मान करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. महापुरुषांचे पुतळे समाजाला सतत प्रेरणा देत असतात. अशा पध्दतीने एखाद्या महापुरुषाच्या पुतळ्याची विटंबना करणे हे समाजामध्ये द्वेष पसरविण्यासारखे असून,
हे देशद्रोही कृत्य आहे. या घटनेने समाजामध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. याची शासनाने तात्काळ दखल घेऊन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याची विटंबना करणार्या समाजकंटकांचा शोध घ्यावा,
आरोपींना अटक करुन त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा व त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.RWS_3475.jpeg