कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी येथे अनुयायांनी येऊ नये; विविध आंबेडकरी संघटनांचे एकमताने आवाहन

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2020 :-भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनी (रविवार, दिनांक ६ डिसेंबर २०२०) तमाम अनुयायांनी मुंबईत दादर स्थित चैत्यभूमी स्मारक येथे येऊ नये आणि कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी होत असलेल्या प्रयत्नांना सहकार्य करावे,

असे आवाहन विविध आंबेडकरी संघटनांच्या वतीने एकमताने करण्यात आले आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जी/उत्तर विभाग कार्यालयाच्या वतीने परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर विविध संघटनांसमवेत बैठक आयोजित करण्यात आली होती.

यावेळी अतिरिक्त पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण, पोलीस उप आयुक्त प्रणय अशोक, महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर, गजानन बेल्लाळे, श्रीमती स्वप्नजा क्षीरसागर यांच्यासह विविध संघटनांचे प्रतिनिधी म्हणून चंद्रकांत कसबे, रमेश जाधव, नागसेन कांबळे, भिकाजी कांबळे, रवी गरुड, प्रदीप व प्रतीक कांबळे, सचिन कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी महानगरपालिका प्रशासनातर्फे माहिती देताना सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर म्हणाले की, प्रतिवर्षी महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे लाखोंच्या संख्येने अनुयायी येतात.

त्यांना बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विविध नागरी सेवा-सुविधा पुरविल्या जातात. मात्र, यंदा कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप कायम असल्याने एकत्र येण्यावर निर्बंध आहेत. हा धोका लक्षात घेऊन मागील ७-८ महिन्यांमध्ये सर्वधर्मीयांनी आपापले सण-उत्सव अत्यंत साधेपणाने आणि एकत्र न येता साजरे केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन हा गांभीर्याने पालन करण्याचा व दुःखाचा दिवस आहे. या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी यंदा चैत्यभूमी येथे प्रत्यक्ष न येता, आपापल्या घरुन अनुयायांनी अभिवादन करावे, अशी नम्र विनंती श्री. दिघावकर यांनी केली आहे.

अनुयायांना येण्यास निर्बंध असले तरी, महापरिनिर्वाण दिनाची प्रतिवर्षीप्रमाणे शासकीय पद्धतीने पूर्ण तयारी करण्यात आली आहे, असे सांगून श्री. दिघावकर म्हणाले की, अनुयायांना अभिवादन करता यावे म्हणून चैत्यभूमी येथील शासकीय मानवंदनेचे व अभिवादन कार्यक्रमाचे ऑनलाईन प्रक्षेपण देखील केले जाणार आहे, त्याची लिंक सार्वजनिकरित्या दिली जाईल. महापरिनिर्वाण दिनी थेट प्रक्षेपण करण्यासाठी दूरदर्शनला देखील विनंती करण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले. चैत्यभूमी वास्तू तसेच अशोकस्तंभ, तोरणा प्रवेशद्वार यांची स्वच्छता करुन रंगरंगोटी करण्यात येत आहे.

चैत्यभूमी, अशोकस्तंभ, भीमज्योती आदी सर्व ठिकाणी पुष्प-सजावट करण्यात येईल. सोबतच चैत्यभूमी येथे महत्त्वाच्या व्यक्तींकरिता नियंत्रण कक्ष उभारणी करुन चैत्यभूमी येथे १ अग्निशमन इंजिन, अतिदक्षता रुग्णवाहिका, ४ बोटी आणि जल सुरक्षा रक्षक देखील तैनात केले जाणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे देण्यात येणाऱ्या नागरी सेवा-सुविधा यंदा नसतील. उर्वरित तयारी योग्यरित्या आणि विहित वेळेत पूर्ण केली जात आहे. शासनाने देखील सर्व अनुयायांना विनंती केली आहे की, कोरोना संसर्ग लक्षात घेता, सर्वांनी विचारपूर्वक व धैर्याने वागून सहकार्य करावे. यंदा घरी राहूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करावे, असे आवाहन केले आहे.

महानगरपालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या आवाहनाला विविध आंबेडकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी एकमताने संमती दर्शविली. दरवर्षी राज्यशासन, बृहन्मुंबई महानगरपालिका तसेच मुंबई पोलीस आणि इतर शासकीय विभाग देखील महापरिनिर्वाण दिनी मोठ्या प्रमाणावर अनुयायांना सेवा-सुविधा देतात. यंदाची स्थिती वेगळी असून त्यात सर्वांचे सहकार्य गरजेचे आहे. चैत्यभूमी ही आपली सर्वांची जबाबदारी असून निर्बंध हे कोरोना रोखण्यासाठी आहेत. सर्व अनुयायी आपापल्या घरुन अभिवादन करतील, अशी ग्वाही या संघटनांनी दिली.

विश्वशांती सामाजिक संस्थेचे अध्यक्ष प्रतीक कांबळे यांनी आवाहन केले की, सर्व अनुयायांनी ‘राष्ट्र निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन’ असा मजकूर लिहून आपले नांव, पत्ता, जिल्हा नमूद करुन चैत्यभूमी स्मारक, दादर (पश्चिम), मुंबई – ४०००२८ येथे पोस्टाने पत्र पाठवून अभिवादन करावे. या उपक्रमास देखील विविध संघटनांनी पाठिंबा दर्शविला.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24