अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- माजीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शब्दाखातर काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदावर पाणी सोडणाऱ्या करण ससाणे यांनी नंतरच्या काळात विखे यांच्या विरोधात जात महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची साथ केली. त्यामुळे श्रीरामपूर पंचायत समितीचे ससाणे गटाला सहज मिळणारे सभापतीपद विखे यांनी काढून घेतले.
आता विखे यांनी नगरपालिकेत लक्ष घातले असून, ससाणे गटाला बाजूला सारत आदिक, मुरकुटे व इतर सर्व गटांची मोट बांधली जात आहे. शनिवारी (दि. १८) विखे यांनी पालिकेच्या विषय समितीच्या निवडीसंदर्भात घेतलेल्या बैठकीला २४ नगरसेवकांनी लावलेली हजेरी याचेच द्योतक असल्याचे बोलले जात आहे.
जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विखे यांनी अलिप्त राहण्याची भूमिका घेतली. त्याचवेळी ससाणे गटाच्या सदस्यांनाही तसेच सूचित केले होते. मात्र, काँग्रेस गटनेते पदाचा राजीनामा देत बाबासाहेब दिघे यांनी विखे यांच्या विरोधी भूमिका घेत थोरातांना पाठबळ दिले.
त्यानंतर पंचायत समिती सभापती निवडीत ससाणे गटाच्या वंदना मुरकुटे यांना सहज सभापतीपद मिळणार होते. मात्र, माजी आमदार भानुदास मुरकुटे व तत्कलिन सभापती दीपक पटारे यांनी ही निवड प्रतिष्ठेची करत थेट विखे यांनाच यात लक्ष घालण्यात राजी केले.
त्यामुळे ससाणे गटाने थोरातांच्या मदतीने संगीता शिंदे यांना गटनेतेपदावरून बाजूला करीत वंदना मुरकुटे यांची वर्णी लावण्यात यश मिळविले. मात्र, त्यानंतरही शिंदे यांनाच सभापतीपदी विराजमान करत विखे यांनी ससाणे गटाला धक्का दिला.
ससाणे गटाचा थोरात यांच्याशी सातत्याने वाढणाऱ्या घरोब्यामुळे विखे यांनी करण ससाणे यांना टाळल्याचे काल एका खासगी कार्यक्रमानिमित्ताने दिसून आले. या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक यांच्याशी वार्तालाप करत या ठिकाणाहून दोघेही बाहेर पडले.
त्यानंतर आदिक व विखे यांच्यात शिर्डी येथील बंद व इतर गोष्टींवर चर्चा झाली. जाताना त्यांना फोनवरून बोलतो, असे सांगून मार्गस्थ झाले. त्यानंतर त्यांनी प्रवरा हौसिंग सोसायटीत त्यांच्या निवासस्थानी पालिकेच्या नगरसेवकांची बैठक घेतली.
या बैठकीला पं. स. माजी सभापती दीपक पटारे, जि. प. सदस्य शरद नवले, नाना शिंदे तसेच अंजुम शेख, राजेश अलघ, रवींद्र गुलाटी, दीपक चव्हाण, किरण लुणिया, रवि पाटील, केतन खोरे, ताराचंद रणदिवे, कलीम कुरेशी, दीपक चरण चव्हाण, रोहित शिंदे, भाऊसाहेब डोळस, विजय शेळके, जितेंद्र छाजेड, बाळासाहेब गांगड, मुक्तार शाह आदींसह २४ नगरसेवक व त्यांचे नातेवाईक उपस्थित होते.
पालिकेच्या विषय समित्या मंगळवारी (दि. २१) निवडल्या जाणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर विखे यांनी घेतलेल्या बैठकीला महत्त्व प्राप्त झाले असून, गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या विषय समित्या यंदा मार्गी लागतील, अशी शक्यता वाढली आहे. विखे यांनी श्रीरामपूर दत्तक घेतल्याचे यापूर्वीच जाहीर केले आहे.
आता त्यांनी या मतदार संघावर लक्ष केंद्रीत केले असून, लवकरच त्यांचे जनसंपर्क कार्यालयही शहरात सुरू होत आहे. त्यामुळे आदिक, मुरकुटे व इतर गटांना सोबत घेत शहरातील रस्ते, पाणी व उद्योग यासह सर्व प्रश्नात ते लक्ष घालणार आहेत.
Web Title – Former Minister Radhakrishna Vikhe Patil created a political earthquake!