अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- विधानसभा निवडणुकीनंतर आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर झालेले आरोप या संदर्भात माजी मंत्री राम शिंदे व माजी आ. शिवाजी कर्डिले यांना सातत्याने विचारणा करण्यात आली. मात्र या विषयावर त्यांनी आज बोलण्यास नकार दिला.
आ. विखे पाटील यांनी मात्र या विषयावर पक्षश्रेष्ठींसमोर सविस्तर आणि मोकळ्या मनाने चर्चा झाल्याचे सांगितले. माझ्यामुळे नुकसान झाले का, पक्षाची ताकद वाढली की नाही आदीबाबत आणि माझ्यावर झालेल्या आरोपाबाबत श्रेष्ठींकडून माहिती घेतली जाईल. त्यानंतर काय तो निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील, असे आ. विखे पाटील म्हणाले.
त्याचप्रमाणे राज्यात भाजप सर्वाधिक मोठा पक्ष ठरला आहे. राज्यात सत्तेवर आलेले सरकार अपघाताने आलेले आहे. राज्यात अनेक ठिकाणी कमी अधिकप्रमाणात नुकसान झालेले आहे, त्या सर्व नुकसानीस विखे कारणीभूत आहेत का, असा प्रतिप्रश्न आ. विखे पाटील यांनी केला.
राष्ट्रवादीने शंभर जागा येतील, असे सांगितले. काँग्रेस स्वबळावर सरकार येईल, असे सांगत होती. त्याबाबत कोणी बोलत नाही, मात्र मी १२-० म्हटल्याने त्यावर चर्चा होत आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत कधी निवडून न आलेले राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष यावर बोलू लागले आहेत, असा टोलाही आ. विखे पाटील यांनी लगावला.