अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर :- जिल्हा नियोजन समितीच्या महापालिका क्षेत्रातील दोन जागांसाठी झालेल्या निवडणुकीत विनीत पाऊलबुद्धे व अनिल शिंदे मताधिक्याने विजयी झाले आहेत.
जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे नगरसेवक अनिल शिंदे व राष्ट्रवादी चे नगरसेवक विनीत पाउलबुद्धे यांनी दणदणीत विजय मिळवला आहे.
या निकालावरून शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये फूट पडल्याचे पहावयास मिळाले आहे. बाप्पा विजयी झाल्याने उपनेते राठोड यांनी धक्का दिल्याचे बोलले जात आहे.
शिवसेनेत उमेदवारीवरुनच संघर्ष उफाळून आला. अनिल शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यावर त्यांच्या विरोधात शिवसेनेच्याच अमोल येवले यांनी उमेदवारी केली.
तसेच सुवर्णा जाधव यांनाही पाउलबुधे यांच्या विरोधात उतरविण्यात आले. सेनेचे दोन उमेदवार समोरासमोर आल्याने शिवसेनेत फूट पडणार असल्याचे चित्र होते.
निवडणूक निकालात अमोल येवले व सुवर्णा जाधव यांना केवळ १०-१५ मते मिळाल्यामुळे शिवसेनेत फूट पडल्याचे स्पष्ट झाले.
तसेच कॉंग्रेस, राष्ट्रवादी व भाजपनेही अनिल शिंदे यांना साथ देत शिवसेनेच्या राठोड गटाला धक्का दिला आहे.
विनीत पाऊलबुद्धे यांना राष्ट्रवादीसह भाजप, इतर पक्ष तसेच शिवसेनेच्याही एका गटाने मदत केल्याचे दिसते आहे. दुसरीकडे शिवसेनेत उभी फूट पडल्याने येवले यांना फटका बसला.