Maharashtra News : निळवंडे जलाशयाच्या उच्चस्तरीय कालव्यातून अंबड, वाशेरे शिवारात पाणी आल्याने या भागातील शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला. माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी केलेल्या अथक प्रयत्नामुळे हे शक्य झाले असून त्यांचा
शेतकऱ्यांच्या वतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागरी सत्कार करण्यात येणार असल्याचे अंबड, धामणगाव आवारी, वाशेरे येथील शेतकरी अप्पा आवारी, गिरजाजी जाधव, उपसरपंच गणेश पापळ यांनी दिली.
ते राजूर येथे माजी मंत्री मधुकर पिचड यांच्या निवासस्थानी आले असता पत्रकारांशी बोलत होते. सोमवारी शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ राजूर येथे माजी मंत्री मधुकरराव पिचड यांना धन्यवाद देण्यासाठी आले होते.
माजी मंत्री पिचड यांचा सत्कार करण्यात आला. जेष्ठ नेते गिरजाजी जाधव म्हणाले, निळवंडे उच्च स्तरीय कालव्याचे पाणी कळस पर्यंत पोहचले असून या कालव्याचे जनक जलनायक मधुकरराव पिचड हेच आहे.
आमच्या परिसरात आनंद व्यक्त होत आहे. ज्यांनी आम्हाला खऱ्या अर्थाने पाणी दिले त्यांची कृतज्ञता मानणे आमचे कर्तव्य आहे. म्हणून माजी मंत्री पिचड यांचा नागरी सत्कार राज्य नेतृत्वाने करावा म्हणून पिचड यांची सत्कारसाठी परवानगी घेण्यासाठी आलो आहोत.
निळवंडे जलाशयमुळे हजारो शेतकऱ्यांचे संसार उभे राहिले ते काम माजी मंत्री पिचड यांनीच केले. आदर्श पुनर्वसन, डावा उच्च स्तरीय कालव्यातून शेतकऱ्यांना पाणी मिळाले असून माजी मंत्री पिचड यांचे योगदान मोठे आहे. त्यामुळे नागरी सत्काराचे आयोजन केल्याचे आवारी म्हणाले.
पिचड झाले भावनिक
निळवंडे जलाशयाच्या उजव्या डाव्या कालव्यातून तसेच उच्च स्तरीय कालव्यातून उपेक्षित भागाला पाणी मिळाले याचा मला आनंद वाटतो. धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या उर्वरित शेतीला पाणी देता आले. उच्चस्तरीय कालव्यातून अंबड, धामणगाव आवा री, वाशेरे, परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी देता आले.
ज्या शेतकऱ्यांसाठी आपण प्रामाणिकपणे काम केले त्यांनी मला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष भेटून मला धन्यवाद देऊन पाणी मिळाल्याचे सांगितले. यापेक्षा माझ्या जीवनात दुसरा आनंद नाही.
मी स्वतःला भाग्यवान सजमजतो. यापुढेही पाणी अडविण्याचा कार्यक्रम सुरू ठेवण्याचे काम करू. निळवंडे, भंडारदरा पाण्यावरील हक्क ठेवण्यासाठी यापुढेही शेतकऱ्यासोबत राहून मी व वैभव पिचड प्रयत्नशील राहू,
अशी ग्वाही देत शेतकऱ्यांचे आमंत्रण माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी स्वीकारले. यावेळी ते भावूक झाले होते.