चार दरोडेखोरांनी दोन ट्रक चालकांना लुटले

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 27 डिसेंबर 2020 :- काही केल्या जिल्ह्यातील चोऱ्या, दरोडे. लुटमारीच्या घटना कमी होताना दिसत नाहीये. जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी मुळे नागरिकांसह बाहेर प्रवास करणाऱ्यांमध्ये देखील दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था कोलमडली असल्याने पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर शंका उपस्थित केल्या जात आहे. नुकतेच चार दरोडेखोरांनी शस्त्राचा धाक दाखवून दोन ट्रक चालकांना लुटले असल्याची घटना घडली आहे.

या प्रकरणी ज्ञानोबा लक्ष्मण मुंढे (वय- 35 रा. खोडवा सावरगाव ता. परळी जि. बीड) यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, ज्ञानोबा मुंढे व त्यांचे मित्र माधव अच्युत होबंळे (रा. हेळंब ता. परळी जि. बीड) हे दोघे जण शनिवारी रात्री नगर- औरंगाबाद रोडवरील सनी पॅलेसमोर त्यांच्या ताब्यातील दोन ट्रका काचा बंद करून आपआपल्या ट्रकमध्ये झोपले होते.

रविवारी पहाटे पावणे चारच्या सुमारास चार दरोडेखोर ट्रक जवळ आले. त्यानी दोन्ही ट्रकच्या काचा फोडल्या व ज्ञानोबा मुंढे आणि त्यांचा मित्र माधव होबंळे यांच्या गळ्याला चाकू सारखे धारदार शस्त्र लावून 18 हजार 500 रूपयांची रोकड काढून घेतली.

यानंतर दरोडेखोर्‍यांनी पळ काढला. घटनेची माहिती तोफखाना पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक किरण सुरसे करीत आहे.

अहमदनगर लाईव्ह 24