Shantabai Kopargaonkar : तमाशा हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा एक अविभाज्य भाग. तमाशा हे असे एक लोकनाट्य आहे ज्याची क्रेज आजच्या या स्मार्टफोनच्या युगात देखील कमी झालेली नाही. आजही महाराष्ट्रात अनेक तमाशा रसिक आहेत.
तमाशा प्रामुख्याने लावणीसाठी ओळखला जातो. लावणी वरूनच तमाशाची ओळख होते आणि लावणीची खरी ओळख आहे लावणी सादर करणाऱ्या कलाकारावरून. म्हणजेच लावणी सादर करणारे कलाकार हाच खरा तमाशा असतो असे आपण म्हणू शकतो.
पण एकेकाळी आपल्या लावणीच्या अदाकारीने प्रेक्षक मायबापांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी एक प्रसिद्ध लावणी सम्राज्ञी आज भीक मागतेय. जिच्या सौंदर्याला, अदाकारीला पाहण्यासाठी लालबाग परळचे हनुमान थेटर चाळीस वर्षांपूर्वी हाउसफुल होत असे.
त्या काळात ज्या लावणी सम्राज्ञीने थेटर गाजवलं ती आज रस्त्यावर भीक मागण्यास मजबूर झाली आहे. ज्या हातांच्या अदाकारीवर प्रेक्षक फिदा होत, त्या हाताला आज लोकांपुढे पसरवून तिला आपला उदरनिर्वाह भागवावा लागत आहे.
विशेष बाब म्हणजे एकेकाळी ती तमाशाच्या फडाची मालकीण होती मात्र आता तिला राहायला घर नाही. बसस्थानकचं तीच राहण्याचं ठिकाण बनले आहे. साहजिकच नेमकी ही लावणी सम्राज्ञी कोण आहे, तिच्यावर भीक मागण्याची वेळ का आली? असे अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील. अशा परिस्थितीत आज आपण या लावणी सम्राज्ञीच्या बाबतीत असं काय विपरीत घडल आहे याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कोण आहे ती लावणी सम्राज्ञी
ही लावणी सम्राज्ञी आहे शांताबाई कोपरगावकर. शांताबाई यांनी 40 वर्षांपूर्वी आपल्या कलेने सबंध महाराष्ट्रातील लावणी प्रेमींना अक्षरशा सैराट वेड लावले होते. त्यांनी अनेक वर्ष आपल्या सौंदर्याच्या आणि अदाकारीच्या जोमावर तमाशाचा फड गाजवला होता. लोक त्यांचा तमाशा केवळ त्यांच्या लावणीसाठी पाहायला जात असे म्हटलं तरी देखील वावगे ठरणार नाही.
पण एकेकाळची ही नटी, प्रसिद्ध लावणी कलाकार, लावणी सम्राज्ञी, तमाशाच्या फडाची मालकीण आज रस्त्यावर भीक मागतेयं. आज शांताबाई कोपरगावकरांचे वय 75 आहे आणि या उतार वयात त्यांच्यावर ही नामुष्की ओढावली आहे.
याबाबत त्यांना विचारले असता त्यांनी त्यांच्यासोबत मोठी फसवणूक झाल्याचे नमूद केले आहे. खरंतर, शांताबाई अगदी लहान वयापासून तमाशात नृत्यकाम करत. लहान वयापासूनच तमाशात काम सुरु केले, पुढे गायनही शिकले. आवाजाची जादू म्हणून गायनातही त्यांचा कोणी हात धरेना. शिवाय देवाने त्यांना अमाप सौंदर्याची भेट दिली होती, याच्या जोडीला नृत्याची कलादेखील होती. यामुळे आवाज, नृत्य आणि सौंदर्य याच्या जोरावर त्यांनी अनेक वर्ष तमाशांचे फड गाजवलेत.
त्यांनी रसूल पिंजारी वडीतकर, भिका भीमा सांगवीकर, धोंडू कोंडू सिंधीकर, हरिभाऊ अनविकर, शंकरराव खिर्डीकर इत्यादी प्रसिद्ध तमाशावंताच्या फडात आपल्या लावणीने तमाशे गाजवलेत. त्या काळच्या टॉपच्या तमाशांमध्ये लावणी करण्याचे योग त्यांना मिळालेत.
हा योग मात्र कुठला योगायोग नव्हता तर त्यांच्याकडे असलेल्या सौंदर्य, आवाज आणि नृत्याच्या जोरावर त्यांनी हा योग घडवून आणला होता. त्यांनी अनेक तमाशांमध्ये आपल्या लावणीने छाप सोडली, लालबाग परळचे हनुमान थेटर गाजवले. पुढे त्यांच सौंदर्य, कला, आवाज आणि तमाशा रसिकांमध्ये त्यांची लोकप्रियता पाहून अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील बस स्थानकात काम करणाऱ्या आत्तार भाई यांनी शांताबाई कोपरगावकर यांच्या समवेत तमाशा काढला.
हा तमाशा मोठा सुपरहिट ठरला. संपूर्ण महाराष्ट्रातील यात्रांमध्ये या तमाशाने नावलौकिक कमवला. एकेकाळी दुसऱ्याच्या तमाशात काम करणारी शांताबाई मालकिन झाली. 50 ते 60 लोकांचे उदरनिर्वाह शांताबाई करू लागल्यात. त्यांच्यामुळे 50 ते 60 लोकांचा परिवार पोसला जात होता. यामुळे शांताबाई मात्र मोठ्या आनंदी होत्या.
तमाशा चांगला गाजला, त्यांच्या लावण्या तर सुपरहिट झाल्या. यामुळे हातात चांगला बक्कळ पैसा देखील आला. मात्र शांताबाई अशिक्षित होत्या. याचा फायदा घेऊन त्यांच्या समवेत फसवणूक झाली. अत्तर भाई यांनी तमाशा विकून टाकला.
यामुळे शांताबाईचे आनंदी आयुष्य उध्वस्त झाले. शांताबाईचा रुतबा गेला. अशातच त्यांना मानसिक आजाराने ग्रासलं. यामुळे त्यांच्यावर भीक मागण्याची वेळ आली. ही लावणीसम्राज्ञी सध्या हलाखीचे आयुष्य जगत आहे. कुणी घर देत का घर? ही नटसम्राटमधील दाहकता आज या लावणीसम्राज्ञीच्या माध्यमातून पुन्हा एकदा अनुभवायला मिळत आहे. शांताबाई अविवाहित आहेत, कुणी जवळच नाही. त्यांचा भाचा आहे जो की मोलमजुरी करतो, तो मात्र थोडेफार लक्ष देतो.
परंतु उदरनिर्वाहासाठी भीक मागण्याविना त्यांच्याकडे काहीच पर्याय नाही. दरम्यान, शांताबाई यांची ही परिस्थिती पाहून पत्रकार अरुण खरात, हेमंत शेजवळ यांनी शिर्डी येथील मल्टी सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल केले आहे.
महाराष्ट्राची सुप्रसिद्ध लावणीसम्राज्ञी, लोकप्रिय तमाशा कलावंत, एकेकाळची लोकप्रिय तमाशा फडाची मालकीण आज या बिकट परिस्थितीत सापडली असून शांताबाई कोपरगावकर आज हक्काच्या घरासाठी मागणी करत आहेत. यामुळे आता या महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध लोककलावंताकडे शासनाचे लक्ष जाईल का? शासन लोककलेसाठी अविरतपणे झिजणाऱ्या या माऊलीला उतारवयात काही मदत करणार का? हा प्रश्न उपस्थित होत आहे.