महाराष्ट्र

कामगार नोंदणीच्या नावाखाली फसवणूक ! कारवाई करण्याची मागणी

Published by
Ahmednagarlive24 Office

Maharashtra News : महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या कामगार कल्याण मंडळामार्फत बांधकाम कारागीर व कर्मचाऱ्यांना विविध योजना व सुविधा सुरू केलेल्या आहेत. त्या माध्यमातून कामगारांच्या अडचणी दूर होतील, ही शासनाची भूमिका आहे;

परंतु या योजनेचा लाभ मिळवून देण्याच्या नावाखाली अनेकांनी आपले हात धुवून घेतल्याचे समोर येत आहे. काही एजंटांनी अनेक लोकांची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप नागरिकांनी केला असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

बांधकाम मजूर तसेच त्या क्षेत्राशी संबंधित असलेल्या मजुरांसाठी शासनाची बांधकाम मजूर कल्याणकारी योजना संबंधित खात्यामार्फत तव्ळागाळातील मजुरांपर्यंत पोहचवण्यासाठी राबविण्यात येत आहे; परंतु या योजनेत खरोखरच बांधकाम मजूर असलेल्या मजुरांचे कल्याण झाले का? की संबधीत विभागाचे अधिकारी आणि एजंटांचेच कल्याण झाले? याची चौकशी होणे गरजेचे आहे.

बांधकाम मजुरांना शासनाकडून बांधकाम साहित्य पेटी, कामगारांच्या मुलांना शिक्षणासाठी तसेच लग्नासाठी काही अनुदान दिले जाते. तसेच या कामगारांना संसारोपयोगी साहित्य शासनाकडून दिले जाते. या बांधकाम मजुरांच्या मुलांना स्कॉलरशिपसुद्धा दिली जाते आणि शासन हे सर्व मोफत विना मोबदला देत असते;

परंतु संबंधित एजंटांनी या कामगारांकडून दोन हजाराच्या आसपास रक्कम प्रतीअर्जानुसार वसूल केली आहे. लोकांनीही योजनेचा लाभ मिळेल, अशी अपेक्षा ठेवून कोणतीही चौकशी न करता डोळे झाकून दोन दोन हजार रुपये या एजंटाना दिले.

या योजनेतील सर्व सवलती व साहित्य मोफत असूनही या कामगारांकडून सहाशे, हजार ते दोन हजार असे व्यक्तीनुरूप पैसे उकळले असल्याचे सांगितले जात आहे. या स्कीमचे अर्ज भरताना वा कामगारांकडून २१० रुपये, नगरला ऑफिसला जायला ५०० रुपये अशा एक ना अनेक कारणांसाठी पैसे उकळल्याचे यातील काही लाभार्थी सांगत आहेत.

या योजनेतील खरोखरचे लाभार्थी बांधकाम मजूर कोणते आणि तोतये लाभार्थी मजूर कोणते, याची चौकशी करून संबंधित एजंट आणि त्यांनी लाभ मिळवून दिलेले बोगस लाभार्थी यांच्याकडून शासनाची आर्थिक फसवणूक करून त्यांच्याकडून वसुली करावी, तसेच यामध्ये कुणी शासकीय अधिकारी सामील आहेत का? याची चौकशी करून त्यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी होत आहे.

या प्रकरणात फार मोठी गुंतागुंत असून गोरगरिबांना लुबाडले गेले असल्याने यातील दोषीवर चौकशी करण्याची गरज आहे. यामध्ये मोठे रॅकेट असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अन्यथा आम्ही जिल्हाभर आंदोलन करणार आहोत.– प्रदीप भोसले, कोल्हार खुर्द

या प्रकरणात कामगार आयुक्तांनी चौकशी करावी. या प्रकाराची स्वतःहून दखल घेऊन यातील दोषींवर कारवाई करावी. ज्या ठेकेदारांनी कामगार असल्याचे खोटे दाखले दिले, त्यांचीही चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी. -अप्पासाहेब दुस, देवळाली प्रवरा

Ahmednagarlive24 Office