Maharashtra News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रात मत मागण्याचा अधिकार नाही. महाराष्ट्राचे उद्योगधंदे गुजरातमध्ये नेले. तसेच कांदा निर्यातीच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक केली. शेतकऱ्यांना कुठलीही कर्जमाफी देण्यात आली नाही,
त्यामुळे मोदींनी महाराष्ट्राच्या जनतेकडे मते मागू नयेत, असे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
पुण्यातील शिवाजीनगर येथील काँग्रेस भवनमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पटोले म्हणाले की, काँग्रेसने जातीनिहाय जनगणनेचा आग्रह धरला असून, न्याय देण्याची मागणी केली आहे.
परिवार वादावर सतत मोदी टीका करत असून, भाजपमध्येही घराणेशाही आहे. मोदींनी जनतेच्या मूळ प्रश्नांवर चर्चा करावी. येत्या ३ तारखेला पुण्यात राहुल गांधी यांची सभा होणार आहे. तसेच नंदूरबार आणि पुण्यामध्ये काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या प्रियंका गांधी यांच्याही रोड शोचे नियोजन करण्यात येणार आहे.
मोदींना सभेसाठी पैसे देऊन लोक जमा करावे लागत आहेत, अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे. भाजपने राजकीय व्यवस्थेत असंस्कृत व्यवस्था निर्माण केली आहे. याचे परिणाम भाजपला भोगावे लागतील. नागपूरची लोकसभेची जागाही काँग्रेस जिंकेल, असा दावाही पटोले यांनी केला.
सांगलीतील जागेचा अंतर्गत वाद सुरू असून, काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांनी बंडखोरी केली आहे. ते अपक्ष निवडणूक लढवत आहेत, त्यांच्यावर कारवाई करणार का? असे विचारले असता नाना पटोले यांनी या प्रश्नाला बगल देत याविषयीचा प्रस्ताव आम्ही वरिष्ठांकडे पाठवला आहे, असे मोघम बोलत उत्तर देण्याचे टाळले.
राहुल गांधीच पंतप्रधानपदाचा चेहरा…
महाविकास आघाडीकडून पंतप्रधान पदावर अधिकृत घोषणा झालेली नसताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मात्र राहुल गांधी पंतप्रधान पदाचा चेहरा असतील, असे सांगितले. महाराष्ट्रात राहुल गांधींपेक्षा नरेंद्र मोदींच्या सभा जास्त होत आहेत,
यावर नाना म्हणाले की, जनतेच्या मनात भारतीय जनता पक्षाबद्दल प्रचंड चीड आहे. मोदी जेवढ्या जास्त सभा घेतील तेवढा फायदा महाविकास आघाडीला होणार आहे. मोदींच्या भाषणात विकासाचे कुठलेच मुद्दे नसून, केवळ घराणेशाही आणि गांधी यांच्यावरच टीका करत आहेत.