Ganeshotsav 2023 : गणेशोत्सव आणि दहीहंडीला ४ दिवस रात्री १२ वाजेपर्यंत डीजेसह लाऊडस्पीकर !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ganeshotsav 2023 : गणेशोत्सवादरम्यान राज्य सरकारकडून यंदा ४ दिवस रात्री १२ वाजेपर्यंत डीजेसह लाऊडस्पीकरला परवानगी देण्यात आली आहे. दहीहंडीच्या दिवशीही अशी परवानगी देण्यात आली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी सह्याद्री अतिथीगृह येथे दहीहंडी व सार्वजनिक गणेशोत्सवाबाबतच्या झालेल्या आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

आढावा बैठकीला मुंबई शहर पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगर पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव मनोज सौनिक, पोलीस महासंचालक रजनीश सेठ, गृह विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक,

मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव यांच्यासह मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती, दहीहंडी असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.

तर सर्व जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, जिल्हा पोलीसप्रमुख दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते. आगामी दहीहंडी, गणेशोत्सव उत्साहाने, शांततेने जल्लोषात साजरे करतानाच कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे.

राज्यातील सर्व आगमन आणि विसर्जन मार्गांची डागडुजी करण्यासाठी जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्तांनी तातडीने कार्यवाही करावी. समाज प्रबोधनाचा संदेश देतानाच पर्यावरणपूरक सण साजरे करण्यासाठी मंडळांनी सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी मुख्यमंत्र्यांनी केले.

दरम्यान, दहीहंडीसह गणेशोत्सवादरम्यान यंदा ४ दिवस रात्री १२ वाजेपर्यंत डीजेसह लाऊडस्पीकरला परवानगी देण्यात आल्याची माहिती गणेशोत्सव समन्वय समिती अध्यक्ष नरेश दहिबावकर यांनी दिली. दीड दिवसाच्या गणपती विसर्जनादरम्यान तसेच ५ व्या, ९ व्या आणि अनंत चतुर्दशी या दिवशी ही परवानगी असणार आहे. सोबतच मंडप व दोन कमानी उभारण्यास परवानगी देण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.

राज्यातील सर्वच ठिकाणच्या आगमन आणि विसर्जन मार्गावरील खड्डे तातडीने बुजवण्यात यावेत, रस्त्यांची डागडुजी करून घ्यावी. गणेश मंडळांना वीज जोडण्यांमध्ये अडचण येता कामा नये. त्याचबरोबर आगमन व विसर्जन मार्गावर येणाऱ्या झाडांच्या फांद्यांची छाटणी करावी, रस्त्यात केबल येणार नाही याची दक्षती घ्यावी, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. मुंबईमधील सर्व रस्ते, गल्लीबोळांमध्ये स्वच्छता ठेवण्याच्या मुंबई महापालिका आयुक्तांना यावेळी सूचना देण्यात आल्या.