अहमदनगर Live24 टीम, 6 सप्टेंबर 2021 :- गणेशोत्सव अवघ्या चार दिवसावर आलेला असतानाच राज्याचे ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी मोठी घोषणा केली आहे.
गणेशोत्सव मंडळांना घरगुती दराने वीज पुरवठा केला जाईल, अशी घोषणा राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज केली. त्यामुळे राज्यातील गणेशोत्सव मंडळांना मोठा दिलासा मिळाला आहे.
गणेशोत्सव पर्व शांततेत पार पडावा, यासाठी नागपुरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ व शांतता समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आज पोलिस जिमखाना येथे पार पडली.
नागपूर शहरातील सर्व पोलीस झोनमध्ये आभासी पद्धतीने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे सदस्य बैठकीला उपस्थित होते.
सार्वजनिक गणेश मंडळांना अखंडीतपणे वीज पुरवठा मिळणार आहे. काही तांत्रिक बिघाड झाल्यास तो दूर करण्यासाठी वीज मंडळाचे कर्मचारी तत्पर राहतील.
सार्वजनिक गणेश मंडळे या काळात तात्पुरता वीज पुरवठा घेतात. गणेशोत्सव काळात वापरलेल्या विजेसाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना घरगुती वीज दर आकारला जाणार असल्याची घोषणा डॉ. राऊत यांनी केली.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची नोंदणी प्रक्रिया सुलभ करावी, अशी सूचना करून डॉ. राऊत म्हणाले, अनेक वर्षांपासून काम करीत असलेल्या गणेशोत्सव मंडळांनी केवळ नूतनीकरणाचा अर्ज भरून नोंदणी करावी.
गणेशोत्सव काळात सार्वजनिक गणेश मंडळांनी सामाजिक मदतीचे उपक्रम राबवावे. कोरोना काळात अनेक मुले अनाथ झाली आहेत. या अनाथांना मदत करण्याचे आवाहन डॉ. नितीन राऊत यांनी केले.