7th Pay Commission:- केंद्र कर्मचारी असो की राज्य सरकारी कर्मचारी यांच्याशी निगडीत महत्त्वाचे विषय म्हणजे सातवा वेतन आयोग तसेच महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वैद्यकीय बिले इत्यादी असतात. या सगळ्या विषयांचा संबंध हा कर्मचारी तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि पेन्शनची निगडित असतो.
त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या यासंबंधी कायमच मागणी असतात. याच पद्धतीने जर आपण बीड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील आस्थापनेवरील सेवानिवृत्त शिक्षकांचा विचार केला तर त्यांच्या देखील अनेक दिवसांपासून सातवा वेतन आयोगाचा फरक,
वैद्यकीय बिले आणि थकीत बिलांची रक्कम इत्यादी बाबत प्रतीक्षा कायम होती. परंतु आता या सेवानिवृत्त शिक्षकांना जिल्हा परिषद वित्त विभाग आणि शिक्षण विभागाच्या माध्यमातून दिलासा मिळेल अशी शक्यता आहे.
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील आस्थापनेवरील सेवानिवृत्त शिक्षकांना दिलासा
याबाबत सविस्तर वृत्त असे की, जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील आस्थापनेवरील सेवानिवृत्त 1112 सेवानिवृत्त शिक्षकांना दिलासा मिळाला असून त्यांचे अनेक दिवसांपासून असलेली प्रतीक्षा संपली आहे. या सेवानिवृत्त शिक्षकांना आता सातवा वेतन आयोगाचा फरकाचा हप्ता,
वैद्यकीय बिले तसेच थकीत बिलांची रक्कम लवकरच मिळणार असून यासंबंधीची महत्त्वपूर्ण कार्यवाही जिल्हा परिषद वित्त विभाग आणि शिक्षण विभागाने केली आहे. यामध्ये पाहिले तर जिल्हा परिषदेच्या या सेवानिवृत्त शिक्षकांचा पहिला ते चौथा म्हणजे चार हप्ते व फरकाची रक्कम बाकी होती.
एवढेच नाही तर गेल्या चार वर्षापासून वैद्यकीय प्रतिपुर्तीची बिले देखील थकीत झालेली होती. ही सगळी रक्कम मिळण्यासाठी सेवानिवृत्त शिक्षकांकडून शिक्षण विभागाकडे तसेच जिल्हा परिषद प्रशासन व शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला जात होता. या पाठपुराव्यामुळे आता शासनाकडून याकरिता निधी उपलब्ध करण्यात आला.
परंतु तरीदेखील शिक्षण विभागातील संबंधित लेखा विभागातील काही कर्मचाऱ्यांकडून कार्यवाही करण्यास विलंब लावण्यात येत होता. त्यामुळे आता सीएमपी क्लिअरन्स संदर्भात या शिक्षकांनी पाठपुरावा केला.
या पाठपुराव्याची दखल घेत मुख्य लेखा वित्त अधिकारी सुरेश केंद्रे यांनी तातडीने कारवाई केली आहे. त्यानुसार आता सदर रक्कम पंचायत समितीकडे पाठवण्यात आली असून गटशिक्षणाधिकाऱ्यांनी संबंधित शिक्षकांची बिले व खाते नंबरची यादी पंचायत समितीकडे सादर केल्यानंतर ही रक्कम संबंधितांच्या खात्यावर आता जमा केली जाणार आहे.
एवढेच नाही तर खाजगी अनुदानित शाळेतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग फरकाचे थकीत हप्ते शाळांच्या लॉगिन वरून ऑनलाईन केले असून जिल्हास्तरीय एकत्र देयकासोबत आठ दिवसात बिले अदा होणार आहेत.