आनंदाची बातमी : 11 जूनला महाराष्ट्रात मान्सून धडकणार !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

मुंबई :- दुष्काळाने होरपळणाऱ्या महाराष्ट्रात बळीराजाला पावसाची प्रतीक्षा आहे. भारतीय हवामान खात्याने याबाबत आपला अंदाज वर्तवला असून मान्सून यंदा 6 जूनला केरळमध्ये दाखल होणार आहे.

केरळमध्ये दाखल झाल्यानंतर साधारण पाच दिवसांमध्ये म्हणजे 11 जूनला महाराष्ट्रात धडकणार, असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

भारतीय हवामान खात्याने विकसित केलेल्या सांख्यिकी प्रारूपाच्या आधारावर हा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यात चार दिवस पुढे-मागे होऊ शकतील, असेही खात्यातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

दरवर्षी 7 जून दरम्यान महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन होते. परंतु, यंदा केरळमध्ये मान्सून उशिरा दाखल होत असल्याने 12 जून रोजी मान्सून महाराष्ट्रात धडकणार असल्याचा अंदाज स्कायमेट या संस्थेने वर्तवला आहे.

तसंच यंदा महाराष्ट्रात पावसाची स्थिती फारशी चांगली नसेल, असा अंदाज आहे. त्यामुळे उन्हाच्या तडाख्याने त्रासलेले सामान्य आणि शेतकरी राजा यांना यंदा पावसाची अधिकच वाट पाहावी लागणार आहे.

तसंच यंदा देशात सरासरी 93% पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर जूनमध्ये महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण कमी असेल आणि जुलैनंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता स्कायमेटने व्यक्त केली आहे.

सध्या राज्यात पिण्याचे पाणी तसेच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनलेला आहे. महाराष्ट्र शासनाने राज्यातील एकूण 151 तालुक्यांत दुष्काळ असल्याचे जाहीर केले आहे.

याअनुषंगाने शासनातर्फे ठिकठिकाणी चारा छावणी तसेच पिण्याच्या पाण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. उशिराने का होईना मान्सून येतोय या बातमीने बळीराजाला आशा लागली आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24