अहमदनगर Live24 टीम, 16 डिसेंबर 2020 :- राज्य सरकारने लसीकरणाची तयारी पूर्ण केली आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी विधानसभेत दिली. तसेच टोपे पुढे म्हणाले कि, लसीच्या वापराला केंद्र सरकारने परवानगी दिल्यावर लसीकरणाला सुरुवात होईल.
लसीकरणासाठी तयारी सुरू आहे. मतदानासाठी ज्या प्रकारे बूथ बांधण्यात येतात त्याच धर्तीवर बूथ उभारून लस दिली जाईल. दरम्यान कोरोना लसीचे उत्पादन करणाऱ्या दोन कंपन्यांच्या क्लिनिकल ट्रायल संपल्या आहेत. या कंपन्यांनी केंद्र सरकारकडे लसीच्या वापरासाठी परवानगी मागितली आहे.
अमेरिका, इंग्लंडमध्ये कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण सुरू आहे. आणखी काही देशांनी आपत्कालीन परिस्थितीत लस देण्यासाठी परवानगी दिली आहे. भारतातही कोरोना संकटावर मात करण्यासाठी व्यापक लसीकरण मोहीम राबवण्याची तयारी सुरू आहे.
लसीकरण मोहीम राबवण्यासाठी केंद्र सरकारने राज्यांशी समन्वय साधून तयारी केली आहे. तसेच लसीकरण मोहीम राबवण्यासाठी मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. लसीच्या वाहतुकीसाठी विशेष वाहनांची व्यवस्था केली आहे.
वापर करेपर्यंत लसीला प्रखर सूर्यप्रकाश लागणार नाही, लस विशिष्ट तापमानात सुरक्षित राहील याची खबरदारी घेतली जाणार आहे. ठिकठिकाणी फ्रीज व्यतिरिक्त निवडक लसी एका टेबलवरुन दुसऱ्या टेबलवर नेण्यासाठी आइसपॅकचा वापर केला जाईल.
कोणत्याही लसीच्या वापराचा निर्णय झाला तरी सुरुवातीला काही रुग्णांना लस टोचून घेतल्यावर त्रास होण्याची शक्यता आहे. या समस्या हाताळण्यासाठी अनुभवी वैद्यकीय पथकांची ठिकठिकाणी नियुक्ती केली जाणार आहे.