अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2020 :- कोरोनाच्या दहशतीखाली असलेल्या राज्यातील जनतेसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. औरंगाबादमधील फुलंब्री हा तालुका करोनामुक्त झाला असून गेल्या 14 दिवसांपासून फुलंब्रीत एकही कोरोना रुग्ण सापडला नाही.
त्यामुळे राज्यातील कोरोनामुक्त तालुका होण्याचा मानही फुलंब्रीला मिळाला आहे. राज्यात कोरोनाचा प्रादूर्भाव वाढल्यानंतर पुणे, मुंबई आणि औरंगाबादमध्ये कोरोनाची सर्वाधिक संख्या आढळून आली होती.
तिन्ही ठिकाणी दिवसे न् दिवस करोनाची संख्या वाढत चालल्याने या शहरांमध्ये अनेकदा कडक लॉकडाऊनही करण्यात आला होता. अनेक ठिकाणी जमावबंदी लागू करण्यात आली होती.
तोंडावर मास्क लावण्यापासून ते मास्क न लावणाऱ्यांना दंड आकारण्यापासूनच्या अनेक उपाययोजनाही करण्यात आल्या होत्या. त्याचा परिणाम म्हणून या तिन्ही शहरातील कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आली होती.
औरंगाबाद जिल्हाही आता हळूहळू कोरोना मुक्तीच्या दिशेने वाटचाल करत आहे. जिल्ह्यातील फुलंब्री तालुका जिल्ह्यात सर्वप्रथम कोरोनामुक्त झाला आहे. गेल्या 14 दिवसांत फुलंब्री तालुक्यात एकही कोरोना रुग्ण आढळला नसल्याचं आरोग्य खात्याकडून सांगण्यात आलं.