Teacher Recruitment : शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी आज, १ सप्टेंबरपासून पवित्र पोर्टल प्रणाली खुली होत असून, पात्र उमेदवारांची ‘पवित्र’ वर नोंदणी सुरू करण्यात येत असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. २० सप्टेंबरनंतर पवित्र पोर्टलवर रिक्त जागांच्या भरतीसाठी जाहिरात येतील. त्यानंतर २ महिन्यांत ३० हजार शिक्षकांची भरती केली जाईल, असेही केसरकरांनी स्पष्ट केले.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आणि खासगी शैक्षणिक संस्थांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी भरती मागील अनेक वर्षांपासून रखडली आहे. सन २०१९ साली करण्यात आलेल्या संचमान्यतेनुसार राज्यात ६७ हजार शिक्षकांची पदे रिक्त आहेत.
त्यातील ८० टक्के (सुमारे ५५ हजार) पदे आगामी शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी (जून २०२३ पर्यंत) भरण्याची घोषणा मंत्री केसरकर यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात केली होती. मात्र, मागील काही महिन्यांपासून शालेय शिक्षण विभाग विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण, संचमान्यता, बिंदूनामावली आदी बाबींवर काम करत असल्याने भरती रखडली आहे.
अखेर शिक्षक भरतीला मुहूर्त मिळाला आहे. याबाबत केसरकर म्हणाले, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेत आणि खासगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांत पुढील दोन महिन्यांत पहिल्या टप्यात ३० हजार शिक्षकांची भरती पवित्र पोर्टलद्वारे केली जाईल.
तर, दुसऱ्या टप्प्यात २० ते २५ हजार शिक्षकांची भरती केली जाईल. पवित्र पोर्टल १ सप्टेंबरपासून उमेदवारांसाठी खुले करत असून, उमेदवार त्यावर आपली अद्ययावत माहिती भरून स्वयंनोंदणी करावी, असेही त्यांनी सांगितले.
१३ लाख विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण बाकी
राज्याच्या शासकीय व अनुदानित शाळांत सध्या २ कोटी १२ लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यातील अजूनही सुमारे १३ ते १४ लाख विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण बाकी आहे. त्यामुळे संचमान्यता व बिंदूनामावलीचे काम रखडले होते. मात्र, ९५ टक्के शाळांची संचमान्यता व बिंदूनामावलीचे काम पूर्ण झाले आहे.
१० जिल्ह्यांतील बिंदूनामावलीचे काम १०० टक्के झाल्याची माहिती मंत्रालयातील शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव तुषार महाजन यांनी दिली. शासनाने आदिवासी (पेसा अंतर्गत) भागातील साडेचार हजार पदे भरण्यास यापूर्वीच मान्यता दिल्याचे महाजन यांनी स्पष्ट केले.