Shaktipeeth Expressway:- राज्यामध्ये जे काही महत्त्वाचे महामार्ग किंवा एक्सप्रेस प्रस्तावित आहेत त्यामध्ये शक्तीपीठ महामार्ग हा एक महत्त्वाचा महामार्ग असून या महामार्गाच्या उभारणीसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून 86000 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.
तसेच पुढच्या वर्षी या कामाचा शुभारंभ प्रस्तावित आहे व पाच वर्षात हे काम पूर्ण होईल असे लक्ष्य ठेवण्यात आलेले आहे. सध्या जर नागपूर ते गोवा प्रवास करायचा असेल तर 18 तासांचा कालावधी हा रस्ते मार्गाने लागतो. परंतु शक्तीपीठ महामार्ग तयार झाला तर हे अंतरावर आठ तासात पूर्ण करता येणे शक्य होणार आहे व महत्त्वाचे म्हणजे राज्यातील हा सर्वात लांब एक्सप्रेस असणार आहे.
शक्तीपीठ महामार्गाकरिता आठ हजार हेक्टर जमिनीचे संपादन करावे लागणार आहे. हा महामार्ग राज्यातील बारा जिल्ह्यातून जाणार असून सहा पदरी असणार आहे. परंतु या महामार्गाला कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून मात्र विरोध सुरू आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील जवळपास 59 गावांमध्ये शेकडो एकर जमीन यामुळे प्रभावित होणार आहे व हा महामार्ग रद्द करावा अशी मागणी कोल्हापूरच नाही तर सांगली जिल्ह्यातून देखील केली जात आहे. परंतु तरी देखील हा विरोध डावलून राज्य सरकारच्या माध्यमातून शक्तीपीठ महामार्गाकरिता भूसंपादन करण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध पण राज्य सरकारकडून भूसंपादनासाठी अधिसूचना जारी
याबाबत सविस्तर वृत्त असे की, कोल्हापूर जिल्ह्याच्या उत्तर बाजूने नागपूर ते गोव्यातील पत्रादेवी दरम्यान उभारण्यात येणारा शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे व या महामार्गाला कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी विरोध केलेला आहे. या महामार्गामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील सहा तालुक्यातील 59 गावांमध्ये शेकडो एकर जमिनी या महामार्गामुळे प्रभावित होणार असल्यामुळे हा महामार्ग रद्द करण्याची मागणी ही कोल्हापूर सह सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या माध्यमातून केली जात आहे.
शेतकऱ्यांचा हा विरोध असताना देखील राज्य सरकारकडून मात्र शक्तिपीठ महामार्ग करिता भूसंपादन करण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. जर आपण या महामार्गाला होणारा विरोध पाहिला तर तो जिल्ह्यातील शेतकरी आणि शेतकरी संघटनाच नाही तर कोल्हापूर जिल्ह्यातील सत्ताधारी महायुतीच्या नेत्यांकडून देखील हा विरोध होत आहे.
कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी देखील हा महामार्ग रद्द करण्याची मागणी केलेली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी तसेच भाजपचे नेते समरसिंह घाटगे यांनी देखील या महामार्गाला विरोध केलेला आहे. एवढा विरोध असताना मात्र राज्य सरकारच्या माध्यमातून हा महामार्ग निर्मिती करिता आवश्यक भूसंपादन करण्यासाठी अधिसूचना जारी केली आहे.त्यामुळे शेतकऱ्यांचा याला आणखीनच विरोध होण्याची चिन्हे दिसून येत आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यातील 59 गावे होणार प्रभावित
या महामार्गामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील 59 गावे बाधित होणार असून यामध्ये भुदरगड तालुक्यातील 21, कागल तालुक्यातील 13, करवीर तालुक्यातील 10, आजरा, हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यामधील पाच गावांचा यामध्ये समावेश आहे. या महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध होत असून 18 जून रोजी याच्या विरोधात मोर्चाची हाक देखील देण्यात आलेली आहे.