महाराष्ट्र

Dhangar Reservation : सरकारने धनगर समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे – आ. डॉ. लहामटे

Published by
Ahmednagarlive24 Office

Dhangar Reservation : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या आरक्षणावर घाला घालण्याचा प्रयत्न सुरू आहे. सरकारने धनगर समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे.

धनगर समाजाला आदिवासीसारखे म्हणजेच आदिवासीमध्ये आरक्षण देण्याच्या विचारात सरकार असून आता राजकारण बाजुला ठेवून आदिवासी सर्व समाज एकत्र येऊन येत्या १४ ऑक्टोबर २०२३ रोजी अकोलेत भव्य मोर्चा सरकार विरोधात येऊन धडकणार असून आदिवासी समाजाच्या आंदोलनाच्या रेट्यापुढे सरकारलाही नमावे लागेल, असा इशारा अकोलेचे आमदार डॉ. किरण लहामटे यांनी दिला आहे.

धनगर समाजाला आदिवासीमध्ये आरक्षण देण्याच्या सरकारच्या निर्णयाविरुद्ध आदिवासी कृती समिती व सर्व आदिवासी संघटनांच्या वतीने १४ ऑक्टोबर रोजी अकोलेत मोर्चा काढण्यात येणार असून याची माहिती देण्यासाठी शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद झाली.

यावेळी आ. डॉ. लहामटे बोलत होते. याप्रसंगी पंचायत समितीचे माजी उपसभापती मारुती मेंगाळ, मारुती लांघी, सुरेश पथवे, वाळिवा धोंगडे, यमाजी लहामटे, बाळासाहेब मधे, आनंद गिऱ्हे, मुकुंद लहामटे, महेश कोकतरे, संजय फोडसे आदी उपस्थित होते.

यावेळी आ. डॉ. किरण लहामटे म्हणाले, १४ ऑक्टोबर रोजी सर्व आदिवासी समाज अकोलेत एकवटणार आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांसमवेत धनगर समाजाची मुंबईत बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी आदिवासींसारखे आरक्षण देऊ, असे धनगर समाजाला आश्वासन दिले व त्यानुसार हलचाली सुरु आहे.

धनगर समाज राज्यातील विधानसभेतील मतदार संघाचा दावा करत असेल तर आमच्या आदिवासी समाजही राज्यातील ६५ मतदारसंघांत निर्णायक मतदार आहे. मी सरकारमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांबरोबर असलो, तरी समाजाच्या लढ्यालाच प्रथम प्राधान्य आहे.

राज्यात ठिकठिकाणी आंदोलने, चक्काजाम, मोर्चे सुरू आहेत. अकोलेतही १४ ऑक्टोबर रोजी भव्य मोर्चा महात्मा फुलै चौक ते तहसील कार्यालयापर्यंत निघणार आहे. आदिवासींच्या आरक्षणाचा अर्थात रोजी रोटीचा प्रश्न असल्याने राजकारण बाजूला ठेवून समाजातील सर्व पक्षातील कार्यकर्ते, पदाधिकारी, नोकरदारांनी या मोर्चात सहभागी व्हावे, असे अवाहनही आ. डॉ. लहामटेंनी केले.

यावेळी मारुती मेंगाळ म्हणाले, राजकारण, पक्ष बाजूला ठेवून आरक्षण बचावण्यासाठी एकत्र येऊन आदिवासी कृती समिती व विविध संघटनांच्या वतीने भव्य मोर्चा १४ ऑक्टोबर रोजी अकोले शहरात निघणार आहे. आरक्षणासाठी मोठ्या संख्येने समाजबांधवानी या मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office