अहमदनगर Live24 टीम, 8 जानेवारी 2021 :- महाविकास आघाडी सरकारने विरोधानंतर पोलीस भरतीचा वादग्रस्त जीआर अखेर रद्द केला आहे. मराठा संघटनांच्या विरोधानंतर राज्य सरकारवर जीआर मागे घेण्याची नामुष्की ओढवली आहे.
मात्र, पोलीस भरतीत SEBC विद्यार्थ्यांना EWSचा लाभ मिळणार आहे. राज्यात पोलीस भरती 2019 करिता एसईबीसी (SEBC) च्या ज्या उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत,
त्यांना मोठा दिलासा देण्यात येत असून गृह विभागाने 4 जानेवारी 2021 रोजी निर्गमित केलेला शासन निर्णय रद्द करण्यात येत आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
पोलीस शिपाई भरती 2019 करिता ज्या एसईबीसी (SEBC) उमेदवारांनी अर्ज केले होते, त्यांना शासनाच्या सा.प्र.वि. कडील 23 डिसेंबर 2020 च्या शासन निर्णयाचा लाभ देण्याच्या दृष्टिकोनातून सुधारित शासन निर्णय गृह विभागाकडून लवकरच निर्गमित करण्यात येणार आहे,
असेही त्यांनी म्हटले आहे यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलिस मेगाभरतीची घोषणा केली होती. मात्र मराठा आरक्षण प्रकरण अद्याप कोर्टात आहे.
त्यावर अंतिम निर्णय आलेला नाही. त्यामुळं तात्काळ पोलीस भरती रद्द करावी. जर पोलिस भरती रद्द केली नाही तर आम्हांला आत्महत्येचा पर्याय द्या, असं मराठा क्रांती मोर्चानं म्हटलं होतं.