अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2021 :- राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या जाहीर झालेल्या निकालांपैकी 5 हजार 721 ठिकाणी यश मिळवत भारतीय जनता पार्टी सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष ठरला आहे.
तीनही सत्ताधारी पक्षांपेक्षा अधिक जागा मिळवत भाजपाने आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिध्द केले आहे, अशी प्रतिक्रिया माध्यम विभाग प्रमुख विश्वास पाठक यांनी व्यक्त केली.
विश्वास पाठक यांनी या संदर्भातील प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, 14 हजार 228 ग्रामपंचायतीपैकी 13 हजार 866 जागांचे निकाल हाती आले असून, त्यापैकी भाजपाने 5 हजार 721 ग्रामपंचायती जिंकल्या आहेत.
ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपा हा सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष ठरला आहे. पाच वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत भाजपाने ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत निर्विवाद यश मिळवले होते.
त्याच यशाची पुनरावृत्ती यावेळी झाली आहे. भाजपाचे ग्रामीण भागातील वर्चस्व ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालातून पुन्हा सिध्द झाले आहे.
सत्तेत असलेल्या तीनही पक्षांनी एकत्रित निवडणूक लढवूनही त्यांना भाजपाच्या आव्हानांचा सामना करता आलेला नाही असेच हे निकाल सांगतात.
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने ग्रामीण भागाच्या विकासासाठी आखलेल्या योजना, तसेच मोदी सरकारने प्रत्यक्षात आणलेल्या अंत्योदयाची योजना यामुळे ग्रामीण भागातील जनतेने भाजपावर विश्वास प्रकट केला आहे, असेही पाठक यांनी म्हटले आहे.