महाराष्ट्र

Gram Panchayat Fund: गावाला आलेला निधी ग्रामपंचायतने कुठे खर्च केला? अशा पद्धतीने घरबसले करा माहिती!

Published by
Ajay Patil

Gram Panchayat Fund:- ग्रामीण भागाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून ग्रामपंचायतीचे महत्व अनन्यसाधारण असते. शासनाच्या माध्यमातून गावाच्या विकासासाठी अनेक प्रकारच्या योजना आणल्या जातात व त्या योजनांची अंमलबजावणी करण्याची महत्त्वाची जबाबदारी ग्रामपंचायतींवर असते.

एवढेच नाही तर समाजातील अनेक घटकांकरिता ज्या काही लाभाच्या योजना असतात त्या देखील ग्रामपंचायतीच्या माध्यमातून राबवल्या जातात. आपल्याला माहित आहेस की ग्राम विकास समितीच्या ऑक्टोबर व नोव्हेंबर दरम्यान बैठका होतात व यामध्ये आरोग्य तसेच शिक्षण व महिला कल्याण इत्यादी महत्त्वाच्या बाबींच्या दृष्टिकोनातून गावाला किती निधीची आवश्यकता आहे?

यावर एक अंदाजपत्रक तयार केले जाते. हे अंदाजपत्रक 31 डिसेंबर पर्यंत पंचायत समितीकडे पाठवण्याची गरज असते व पंचायत समिती हे अंदाजपत्रक राज्य सरकारकडे मंजूरीकरता पाठवते. अशा पद्धतीने निधी मंजूर झाल्यावर गावाच्या विकासासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टींसाठी तो ग्रामपंचायती कडे वर्ग केला जातो

व ग्रामपंचायत आवश्यक त्या गोष्टींवर तो निधी खर्च करत असते. परंतु बऱ्याचदा आपल्याला गावासाठी आलेला सरकारी निधी ग्रामपंचायत नेमके कुठे खर्च करते हे कळत नाही. तुम्हाला देखील हे जाणून घ्यायचे असेल तर तुम्ही ग्रामपंचायतने कुठे किती पैसा खर्च केला? हे अगदी घरी बसून पाहू शकतात.

 ग्रामपंचायतीने किती पैसा खर्च केला हे अशा पद्धतीने पहा

24 एप्रिल 2020 रोजी म्हणजेच पंचायत राज दिनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ई ग्राम स्वराज्य हे मोबाईल ॲप लॉन्च केले.या एप्लीकेशनच्या माध्यमातून तुम्हाला ग्रामपंचायतीच्या विकास कामांची सविस्तर माहिती पाहायला मिळते.

असे शासनाकडून ग्रामपंचायतींना प्राप्त झालेला निधी ग्रामपंचायतने कुठे खर्च केला याची सर्व माहिती या माध्यमातून उपलब्ध होते. त्यामुळे गावाचा नागरिक म्हणून तुम्हाला ग्रामपंचायतीचे नेमके कुठे कामे चालले आहेत याबद्दल मोबाईलच्या माध्यमातून तुम्हाला माहिती मिळू शकते. याकरिता तुम्हाला…

1- तुमच्या मोबाईल मध्ये असलेल्या गुगल प्ले स्टोअर वर जाऊन ग्राम स्वराज हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करणे गरजेचे आहे.

2- हे ॲप्लिकेशन डाऊनलोड केल्यानंतर ते ओपन करावे व त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होते.

3- यामध्ये प्रथम तुम्हाला राज्यात तुमचे राज्य, जिल्हा परिषद या कॉलम मध्ये तुमचा जिल्हा तसेच ब्लॉक पंचायतीमध्ये तालुका आणि ग्रामपंचायत मध्ये तुमचे गावाचे नाव निवडावे लागते.

4- संबंधित माहिती निवडल्यानंतर तुम्हाला सबमिट बटणावर क्लिक करावे लागेल.

5- त्यानंतर एक नवीन पेज तुमच्यासमोर उघडेल. या पेजवर वरच्या बाजूला तुम्ही जी काही अगोदर माहिती भरलेली आहे ते संपूर्णपणे तुम्हाला दिसेल व तुमच्या गावाच्या नावापुढे कोड क्रमांक देखील दिसतो.

6- या पर्यायामधून तुम्हाला ज्या वर्षासाठी आर्थिक वर्षाची माहिती पाहिजे आहे ते वर्ष निवडावे लागते.

7- त्यानंतर तुम्हाला तीन भिन्न पर्याय दिसतात व यातील पहिला पर्याय इलेक्टेड रिप्रेझेंटिव्ह म्हणजे ER चा तपशील असतो व यामध्ये निवडून आलेले ग्रामपंचायतचे प्रतिनिधी यांची माहिती असते.

8- या पर्यायावर क्लिक करून तुम्ही गावचे सरपंच, सचिव तसेच ग्रामपंचायत सदस्य यांचा तपशील तपासू शकतात.

9- त्यानंतर दुसरा पर्याय अप्रूव्हड ऍक्टिव्हिटीज हा असून यामध्ये ग्रामपंचायतींना कामकाजाकरिता किती निधी मंजूर करण्यात आला आहे हे या ठिकाणी नमूद असते.

10- त्यानंतरचा तिसरा पर्याय म्हणजे आर्थिक उन्नती हा आहे. यामध्ये गावाची आर्थिक प्रगतीची माहिती असते. या पर्यावर क्लिक केल्यावर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल व त्या ठिकाणी तुम्ही निवडलेले आर्थिक वर्ष सुरुवातीला दिसते व त्यानंतर गावाचा कोड आणि नाव दिले जाते.

11- तुम्ही निवडलेल्या आर्थिक वर्षात तुमच्या गावाला मिळालेल्या निधीची रक्कम नंतर रिसिप्ट पर्याय समोर दिली जाते. तसेच निधी खर्च करण्याची रक्कम एक्सपेंडेचर या पर्यायासमोर दिलेले असते.

12- त्यानंतर खाली लिस्ट ऑफ स्कीम हा पर्याय आहे व यातून ग्रामपंचायतींना मिळणाऱ्या एकूण निधीचे वाटप केले जाते. यामध्ये एकूण किती पैसे मिळाले आणि कोणत्या योजनेत किती पैसे खर्च झाले याची सविस्तर माहिती दिलेली असते.

 अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या मोबाईलवरून ग्रामपंचायतीला मिळालेला निधी व खर्च केलेला निधी पाहू शकतात.

Ajay Patil