द्राक्षांचा गोडवा सातासमुद्रापार पोहोचवणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी सध्या बदलत्या हवामानामुळे चिंताग्रस्त झाले आहेत. कधी हाडे गोठवणारी थंडी, तर कधी अवकाळी पावसाची अवकृपा यातून कसेबसे सावरलेले शेतकरी आता ढगाळ हवामानासह धुक्याचा सामना करत आहेत.
या बदलत्या हवामानामुळे द्राक्ष उत्पादकांना रोज बागेवर फवारणी – करावी लागत आहे. मात्र, आणखी – किती दिवस निसर्गनिर्मित संकटांचा सामना करावा लागणार, अशी चिंताही त्यांना सतावत आहे.
भारताची द्राक्ष राजधानी म्हणून ओळखला जाणारा नाशिक जिल्हा देशातील आघाडीचा द्राक्ष उत्पादक जिल्हा आहे. भारतातून होणाऱ्या एकूण द्राक्ष निर्यातीपैकी ५५ टक्के आणि महाराष्ट्रातून ७५ टक्के निर्यात एकट्या नाशिकमधून – होते. नाशिक जिल्ह्यात ६२ हजार ९८२ हेक्टर क्षेत्रावर द्राक्षांची लागवड केली जाते. त्यात निफाड. दिंडोरी आणि नाशिक हे तालुके द्राक्ष उत्पादनात अग्रेसर आहेत.
डिसेंबर २०२४ मध्ये झालेला अवकाळी पाऊस व गारपिटीने निफाड, दिंडोरी, कळवण, सटाणा या तालुक्यांतील बहुतांश शेतपिके उद्ध्वस्त झाली. त्यात आता नववर्षात थंडी कमी झालेली असतानाच ढगाळ वातावरण तयार झाले आहे.
या ढगाळ हवामानाचा सर्वाधिक फटका द्राक्षबागांना बसण्याची शक्यता आहे. यामुळे द्राक्ष उत्पादकांचा जीव टांगणीला लागला आहे. ढगाळ वातावरणाने द्राक्षमण्यांना तडे जाण्याचे प्रमाण वाढले आहे. तर, डाउनी रोगाचा प्रादुर्भाव वेगाने वाढण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे
तज्ज्ञांच्या सल्ल्याने औषध फवारणी
हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार, ढगाळ वातावरण असेच राहिले, तर द्राक्षबागांवर प्रचंड प्रमाणात औषधांची फवारणी करून भुरी, डाउनी आटोक्यात आणावा लागणार आहे. सध्या औषधांच्या फवारणीशिवाय त्यांच्यापुढे काहीच पर्याय नाही. त्यामुळे डाउनी रोगाचा प्रादुर्भाव पाहता तज्ज्ञांचा सल्ला घेत औषधांची मात्रा ठरवून द्राक्ष उत्पादकांनी फवारणी सुरू केली आहे.