अहमदनगर :- जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी जलसंधारणाच्या कामात कोट्यावधीचा भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप अॅड. कैलास शंकरराव शेवाळे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
तसेच ‘प्रा. राम शिंदे यांचे खरे नाव रामदास शिंदे असून, त्यांनी ‘रामदास’ऐवजी ‘राम’ नाव लावणे सुरू केले आहे.
सेट-नेट परीक्षा उत्तीर्ण न होता वा पीएचडी न मिळवता ते स्वतःपुढे ‘प्रा.’ अशी उपाधी लावतात, त्यांचे शिक्षण एम.ए. बी.एड आहे,
त्यामुळे त्यांनी नावात व पदवीतही खोटेपणा केला आहे,’ असाही दावा कर्जत येथील माजी जिल्हा परिषद सदस्य शेवाळे यांनी केला आहे.
राज्याचे जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी त्यांचे वडील शंकर बापू शिंदे यांच्या नावावर चौंडी येथे चौंडी ते अरणगाव रस्ता व चौंडी ते देवकरवस्ती रस्ता
या दोन्ही रस्त्यांवर अनुक्रमे 15 मिटर ते 12 मिटर शासकीय जमिनीवर अतिक्रमण करुन बंगला बांधल्याचा आरोप शेवाळे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
या संदर्भात जिल्हाधिकार्यांना निवेदन दिले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडेही तक्रार करण्यात आली आहे.
अतिक्रमणावर कारवाई न झाल्यास उच्च न्यायालयात दाद मागण्याचा इशारा शेवाळे यांनी दिला आहे.
दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भ्रष्टाचार आणि अतिक्रमणाचा विषय उपस्थित झाल्याने पालकमंत्र्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.