महाराष्ट्र

हर खेत को पानी : अहमदनगर, नाशिक, जळगाव, नंदुरबार, धुळे जिल्ह्यात ५३ हजार ४४५ विहीरी !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

‘हर खेत को पाणी’ या संकल्पनेनुसार राज्यभरात प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर १५ विहिरी घेण्याचे नियोजन आखण्यात आले. त्यासाठी विहिर व फळबाग मागणी अॅप्लिकेशनवर मागणी नोंदवता येणार आहे. नाशिक विभागात ५३ हजार ४४५ विहिर घेण्याचे नियोजन असले, तरी पुरेशी जागृती नसल्याने विभागातून महिनाभरात अवघे १ हजार ३४७ ऑनलाईन प्रस्ताव दाखल झाले आहे.

मनरेगा महासंचालकांनी राज्यातील सर्व गटविकास अधिकाऱ्यांची कार्यशाळा घेतली. त्यात हर खेत को पानी तसेच कॅच द रेन या संकल्पनेनुसार कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. त्यासाठी इजीएस हॉर्टी अॅपवर शेतकऱ्यांना ऑनलाईन मागणी नोंदवता येते.

ही योजना रोहयो अंतर्गत असल्याने जॉब कार्ड असलेल्या व निकष पूर्तता करणाऱ्या शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज करता येतो. प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर मिशन मोडवर १५ विहीरी घेण्याचे उद्दिष्ट आहेत.

त्यात नाशिक विभागातील अहमदनगर, नाशिक, जळगाव, नंदुरबार, धुळे जिल्ह्यातील सेफ झोनमधील सुमारे ५५६ ग्रामपंचायत स्तरावर तब्बल ५३ हजार ४४५ विहीरी घेण्याचे उद्दिष्ट आहे. महिनाभरात दाखल झालेल्या १३४७ ऑनलाइन अर्जावर अंतिम निर्णय नसल्याने अद्याप कामे सुरू झाली नाही.

महिनाभरात जिल्हानिहाय आलेले अर्ज नाशिक विभागातील अहमदनगर २८१, धुळे २७९ जळगाव १५२, नंदुरबार ३३२, नाशिक ३०३ असे एकुण १३४७ ऑनलाईन अर्ज अॅपवर आल्याची माहिती रोहयो कार्यालयाने दिली. तसेच ज्यांनी ऑफलाईन अर्ज केले होते, त्यांनाही ऑनलाईन अर्ज करायला सांगितले आहे.

अशी असेल प्रक्रिया
अॅप्लिकेशनवर ऑनलाईन अर्ज केल्यानंतर या प्रस्तावांना ग्रामसेवकांमार्फत ग्रामसभेचा ठराव जोडला जाईल. त्यानंतर तालुकास्तरावर छाननी करून प्रस्तावात त्रुटी असतील तर पूर्तता केली जाईल. प्रस्ताव पूर्ण असेल तर तांत्रिक मान्यता दिली जाईल. या प्रक्रियेमुळे दाखल केलेल्या प्रस्तावांना मंजुरी देण्याची प्रक्रिया गतीमान होईल

ॲपचा फायदा काय?
एरवी विहिरीसाठी ऑफलाईन अर्ज केल्यानंतर प्रस्ताव कुठे व कोणत्या स्टेजवर आहे, याबाबत माहिती मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना प्रशासकीय दप्तरी खेटा घालाव्या लागत होत्या. परंतु, आता अॅपवर ऑनलाईन मागणी नोंदवल्यानंतर प्रस्ताव कोणत्या स्टेजला आहे, तसेच प्रस्तावातील त्रुटी काय हे थेट समजून मंजुरीला गती मिळणार आहे.

अहमदनगर लाईव्ह 24