अहमदनगर Live24 टीम ,23 जून 2020 : सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आलेल्या टिकेला भाजप नेते माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी Twitter वरून उत्तर दिले आहे.
या पत्रात विखे यांनी सामनाचे कार्यकारी संपादक तथा खासदार संजय राऊत यांना जोरदार प्रत्युत्तर देत टाळेबंदीच्या काळात कॉंग्रेसचे प्रवक्तेपद स्विकारले आहे का?असा बोचरा सवाल राउतांना विचारला आहे.
या पत्रात विखे यांनी म्हंटले आहे, ‘थोरातांची कुरकुर नाहीच, विखेंची टूरटूर’ या शीर्षकाखाली शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ या दैनिकात आपण माझ्यावर थेट अग्रलेख लिहिलात, याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो.
आम्ही राजकीय पक्ष बदलले पण ज्या पक्षात राहिलो त्याचे निष्ठेने काम केले. आमची छाती फाडून पाहिली तर एका वेळी एकच नेता दिसेल.तुमची फाडून पाहिली तर उद्धव ठाकरे आणि शरद पवार असे दोघेही दिसतील.
तुमचा हा बेगडीपणा लोकांना चांगलाच कळतो. त्यामुळेच तुम्हाला फारसे गांभीर्याने घ्यायचे नसते हे आता लोकांना कळू लागले आहे. एकीकडे राजभवनाबाबत धमकीवजा भाषा वापरायची
आणि दुसरीकडे वाकून, लवून राजभवनावर कुर्निसात करायचा हे कोलांटउडीचे डोंबारी राजकारण आपण किती सहजगत्या करता हे अलीकडे महाराष्ट्राने बघितले आहेच, अशा शब्दात विखे यांनी राउत यांना फटकारले आहे.
आपल्याच शब्दात सांगायचे तर मी सध्या वनवासात आहे.वनवासात असलेल्या विखेंची तुम्हाला अग्रलेख लिहून दखल घ्यावी लागली हेही नसे थोडके. मी राजकारणापासून दूर राहिलेलेच बरे असा सल्लाही आपण दिला आहे.
फक्त जनता जनार्दनाला साक्षी ठेवून एवढेच सांगू इच्छितो की मी आपल्या कृपेने राजकारणात आलेलो नाही. त्यामुळे आपल्या सल्ल्याने राजकारणापासून दूर जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मला, माझ्या मुलाला व आतापर्यंत माझ्या घराण्याला राजकारणात भरभरून प्रतिसाद देण्याचे काम नगर जिल्ह्यातील जनतेने केले आहे.
आमची बांधिलकी त्या जनतेशी आहे आमची बांधिलकी कधी सिल्व्हर ओक तर कधी मातोश्री अशा अस्वस्थ येरझारा घालत नाही. नगर जिल्ह्यातील जनतेशी विखे घराण्याची नाळ पक्की जुळलेली आहे, असेही विखे यांनी या पत्रात नमूद केले आहे
तसेच एकीकडे राजभवनात धमकीवजा भाषा वापरायची आणि दुसरीकडे वाकून लावून राजभवनावर कुर्निसात करायचे, हे कोलांटउडीचे डोंबारी राजकारण आपण किती सहजगत्या करता हे अलीकडे महाराष्ट्राने बघितले आहेच. अशी टीका देखील त्यांनी केली आहे.
सामनाच्या पारदर्शक धोरणाप्रमाणे हे पत्र सामनात छापाल अशी अपेक्षाही या पत्रातून विखेंनी व्यक्त केली आहे. थोरातांची कमळा असा काहीसा उल्लेख आपण अग्रलेखात केला आहे.
कमळ हातात घेण्यासाठी रात्रीच्या अंधारात कोण, केव्हा, कुठे कशी चाचपणी केली होती हा एक वेगळा इतिहास आहे. ती चाचपणी यशस्वी झाली असती तर आपण केलेला उल्लेख कदाचित खरा ठरला असता.
आज त्याच्या खोलात मला जायचे नाही. मातोश्रीविरुद्ध बंड करण्यासाठी कृष्णकुंजला कुणाची चिथावणी होती आणि कोणी वेळेवर यू-टर्न घेतले हा इतिहास अनेकांना माहिती आहेच, असेही विखेंनी या पत्रात नमूद केले आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews