अहमदनगर Live24 टीम, 7 नोव्हेंबर 2020 :- नाशिक-पुणे बाह्यवळण महामार्गावर संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी शिवारात एका टेम्पोसह तीन कारचा भीषण अपघात झाला आहे.
ही सर्व वाहने पुण्याकडून नाशिकच्या दिशेने निघाली होती. दरम्यान या विचित्र घडलेल्या अपघातात एका तृतीयपंथीयाला आपला जीव गमवावा लागला, तर या गडबडीत घडलेल्या चार वाहनांच्या विचित्र अपघातात अन्य दोघे जखमी झाले आहेत.
या अपघातानंतर नाशिककडे जाणारा रस्ता काहीकाळ बंद झाला होता. जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार आज नाशिककडे जाणार्या बाजूला आज सकाळी तिघे तृतीयपंथीय वाहने थांबवून दान मागत होते.
या दरम्यान याचवेळी पुण्याहून नाशिकच्या दिशेने जाणार्या स्वीफ्ट कारच्या (क्र.एम.एच.12/इ.एक्स.2728) चालकाने महामार्गावरुन सुरू असलेल्या रहदारीकडे दुर्लक्ष करीत त्यांना दान देण्यासाठी आपले वाहन उभे केले.
अचानक समोरचे वाहन उभे राहिल्याने त्यापाठीमागून आलेल्या दुसर्या कारने (क्र.एम.एच.14/एच.क्यू.1728) त्याला पाठीमागून जोराची धडक दिली.
त्याचवेळी त्यापाठीमागे असणार्या तिसर्या वाहनाच्या (क्र.एम.एच.11/बी.डी.6093) चालकाचाही गोंधळ उडाल्याने त्यानेही अपघातग्रस्त दुसर्या वाहनाला पाठीमागून जोराची धडक दिली.
तसेच त्यांनतर पुण्याहून भरधाव वेगाने नाशिककडे निघालेल्या आशयर टेम्पोने हा अपघात पाहिला व आपली गाडी कॉन्ट्रोल करण्याच्या नादात टेम्पो रस्त्याच्या मधोमध असलेल्या रस्ता दुभाजकावर चढला.
या अपघातात तीनही वाहनांचे अवशेष रस्त्यावर विखुरले तर दान मागणार्या तिघा तृतीय पंथीयातील साई अंकिता साथी या तृतीयपंथीयाचा जागीच मृत्यू झाला,
तर शैलेश श्रीराम बिर्ला (वय 52) व त्यांची पत्नी सोनल (वय 46, रा. हडपसर, पुणे) हे कारमधील दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
या दोघांनाही खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे त्यांच्यावर उपचार करणार्या डॉक्टरांनी सांगितले आहे.
अपघाताची माहिती मिळताच शहर पोलीस निरीक्षक अभय परमार तातडीने घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला करुन वाहतुकीसाठी रस्ता खुला केला.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved