अमरावती :- विधानसभा निवडणूक माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मी पुन्हा येईल ह्या विधानाने चांगलीच गाजली, फडणवीस यांचे हेच वाक्य चक्क एका तरुणाने विनयभंग करताना वापरलेय.
याबाबत सविस्तर माहिती अशी कि कपडे धुणाऱ्या एका ३० वर्षीय महिलेची छेड काढून ‘मी उद्या पुन्हा येईल’ अशी धमकी देणाऱ्या एका २८ वर्षीय युवकाविरुद्ध माहुली पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीवरून रविवार, १५ डिसेंबरला विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
गोलू जयेंद्र मनोहरे (२८) असे पोलिसांनी गुन्हा दाखल केलेल्या युवकाचे नाव आहे. माहुली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात राहणारी ३० वर्षीय महिला गावातच एका ठिकाणी कपडे धुवत होती. त्यावेळी तिची लहान मुलेसुद्धा आजूबाजूने खेळत होती.
त्याचदरम्यान गोलू त्या ठिकाणी आला व त्याने विवाहितेसोबत असभ्य वर्तन करण्यास सुरुवात केली. या वेळी महिलेने आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला, तर त्याने महिलेचे तोंड दाबण्याचा प्रयत्न केला. या वेळी घडलेला प्रकार महिलेच्या मुलांच्या लक्षात आला व मुलांनी रडणे सुरू केले.
त्यामुळे आता गावकरी येतील आणि आपण पकडले जाणार, हे गोलूच्या लक्षात येताच त्याने घटनास्थळावर पळ काढला. मात्र पळत असतानाच त्याने महिलेला धमकी दिली की, ‘मी उद्या पुन्हा येईल’!. या धमकीमुळे पीडित महिला घाबरली.या प्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी गोलू मनोहरेविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.