अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2021 :- दिवसेंदिवस तंत्रज्ञान विकसित होत आहे. मात्र आता याचा दुरुपयोग देखील होत आहे. नुकत्याच झालेल्या पोलिस भरतीच्या लेखी परीक्षेत एका परीक्षार्थीने चक्क मास्कमध्ये इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस बसवल्याचा धक्कादायक प्रकार हिंजवडी येथील परीक्षा केंद्रावर घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील ८० केंद्रावर परीक्षा घेण्यात आली. परीक्षा केंद्रावर आलेल्या उमेदवारांची तपासणी सुरू होती. त्यावेळी एका उमेदवाराच्या मास्कचे वजन जास्त असल्याचे एका पोलिसाच्या लक्षात आले.
त्यामुळे त्यांनी मास्कची तपासणी केली. तपासणीत मास्कमध्ये इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस बसवल्याचे समोर आले. त्यामध्ये एक सिमकार्ड देखील मिळून आले आहे.
दरम्यान, आरोपी उमेदवाराने परीक्षा केंद्रावरून पळ काढला. त्या उमेदवारावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशीरा पर्यंत सुरू होती. अशी माहिती पोलीस निरिक्षक बालकुष्ण सावंत यांनी दिली.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत पोलिसांच्या ७२० पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. त्यासाठी पहिला टप्पा म्हणून लेखी परीक्षा होत असून राज्यभरातून तरुणांनी अर्ज सादर झाले होते.
परीक्षेत गैरप्रकार टाळण्यासाठी परीक्षा केंद्रावर परीक्षार्थींचे व्हिडिओ शुटिंगबरोबरच कडक तपासणी तसेच परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी भरारी पथकांची नियुक्ती केली होती.