अहमदनगर Live24 टीम ,8 जुलै 2020 : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या लॉकडाऊनमुळे तब्बल तीन महिने राज्यातील हॉटेल्स बंद होते. परंतु आता राज्यशासनाने अनलॉकच्या या टप्प्यात राज्यातील हॉटेल्स, लॉज सशर्त सुरू करण्याचे नियोजन केले आहे.
परंतु असे असले तरी शिर्डीतील हॉटेल सुरू न करण्याची भूमिका हॉटेल व्यावसायिकांनी घेतली आहे. कारण साई मंदिर बंदच असणार आहे.
त्यामुळे हॉटेल उघडून जास्त काही फायदा होणार नसल्याचे व्यावसायिकांचे मत आहे. मार्चमध्ये कोरोनाचा उद्रेक होऊन लॉकडाउन झाला. मंदिर बंद करण्यात आले.
भविष्यात काही नियम पाळून मंदिर सुरू करण्यास परवानगी मिळाली तरी आणखी काही काळ भाविकांची संख्या कमीच राहणार आहे.
त्यामुळे गर्दीवर अधारित अर्थशास्त्र असलेल्या शिर्डीकरांसाठी हॉटेल व्यवसाय सुरु करणें व्यवहार्य ठरेल असे दिसत नाही. शिर्डीत छोटी मोठी मिळून सुमारे साडेसातशे हॉटेल आहेत.
ही हॉटेल आणि साईबाबा संस्थानची भक्तनिवास यांचा विचार केल्यास शिर्डीत पन्नास हजार भाविक मुक्काम करू शकतात. नव्या नियमानुसार ३३ टक्के ग्राहकांना राहू द्यायचे ठरले तरी पंधरा ते सोळा हजार भाविक राहू शकतात.
मात्र, मंदिर सुरू नसल्याने सध्या भाविकच येत नाहीत. सरकारने नियम अटी घालून मंदीर उघडण्यास परवानगी दिली तरी एका दिवशी केवळ साडेतीन हजार भाविक दर्शन घेऊ शकणार आहेत.
भाविकांना टाइम् स्लॉटनुसार दर्शनाची सोय करण्यात येणार आहे. त्यामुळे ज्या दिवशी आणि वेळी आपला क्रमांक येणार आहे, त्या दिवशी शिर्डीत येऊन परत जाण्यावरच भाविक जास्त भर देण्याची शक्यता आहे.
त्यामुळे शिर्डीत मुक्काम करणाऱ्या भाविकांची संख्या पूर्वीपेक्षा किती तरी पटीने कमी होण्याची शक्यता आहे. किमान नियम कडक असेपर्यंत म्हणजे या वर्षाखेरपर्यंत तरी शिर्डीतील हॉटेलच नव्हे तर अन्य व्यावसायही अडचणीत सापडणार आहेत.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews