राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. त्यासाठी लॉकडाऊन सुरु आहे. या आजाराचा जास्त फैलाव होऊ नये यासाठी सोशल डिस्टंस पाळण्याचे आवाहन सरकारकडून करण्यात येत आहे.
परंतु काहींना याचे भान नसल्याचं समोर आलं आहे. भाजपचे नवनिर्वाचित आमदार रमेश कराड यांनी लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेतलं.
आमदार रमेश कराड गोपीनाथ गडावर आल्याचं पाहून शेकडो कार्यकर्ते जमले होते. यादरम्यान सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला तर संचारबंदीचेही नियम धाब्यावर ठेवण्यात आले.
यावेळी आमदार रमेश कराड यांच्या चेहऱ्यावर मास्क नव्हता. धक्कादायक म्हणजे त्यांच्याकडून कोरोनाबद्दल कोणतीही काळजी यावेळी घेण्यात आली नाही.
बीड जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने सोशल डिस्टन्सिंग आणि संचारबंदीचे नियम पाळा, असं राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासन आवाहन करत आहे. मात्र, लोकप्रतिनिधींकडूनच या नियमांची पायमल्ली केली जात असल्याचं निदर्शनास आलं आहे.