अहमदनगर लाईव्ह 24 टीम / औरंगाबाद :- हिंदुत्वाचा मुद्दा कोण कसा मांडतो अन् तो कसा पुढे नेतो हे महत्त्वाचे आहे. मी पक्षाचा झेंडा बदलला. पण भूमिका तीच आहे. माझ्या मराठीला नख लावाल तर मराठी म्हणून आणि धर्माला नख लावाल तर हिंदू म्हणून अंगावर जाईल, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी दिला.
मी तर फक्त झेंडा बदलला, काही लोकांनी सत्तेसाठी भूमिका बदलल्या. त्यांना जाब विचारण्याची कोणाची हिंमत नाही. मी मांडलेल्या मुद्द्यांवर अद्याप कोणताही पक्ष बोललेला नाही, अशा शब्दात राज यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला.
पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करताना राज ठाकरे म्हणाले, राज्याच्या विकासासाठी ब्लू प्रिंट समोर आणली होती. भाजप सरकारने यातील काही गोष्टी घेतल्या. ब्लू प्रिंट सर्वांसाठी खुली आहे. सध्याच्या सरकारला ती पुन्हा देण्याऐवजी त्यांनी ती बघितल्यास निश्चितच बदल घडून येईल.
मराठवाड्यात ऊस हद्दपार करण्यासंदर्भात चर्चा होते. मुळात जमीन पोषक आहे का? पाणी उपलब्ध आहे का? पश्चिम महाराष्ट्रात ज्या गोष्टी आहेत त्या मराठवाड्यात आहेत का याचा विचार करूनच उसाचे उत्पादन घ्यायला हवे, असेही ठाकरे म्हणाले.
दिल्लीमध्ये हिंदुत्वाचा प्रचार झाला पण विकासाला मत मिळाले. दिल्ली दिल्ली आहे, महाराष्ट्र हा महाराष्ट्र आहे. नाशिकमध्ये विकास करूनही काय झाले हे आपणास माहिती आहे. प्रत्येक जिल्ह्याची ब्लू प्रिंट तयार आहे. निवडणुका आल्यावर ती सर्वांसमोर आणू. घुसखोरांना माझा आधीपासूनच विरोध आहे.
चिरीमिरी घेऊन घुसखोरांना आपले करू नका हे मी नेहमीच अधिकाऱ्यांना सांगतो. औरंगाबादचे नाव संभाजीनगर करायला हरकत नाही. एखाद्या शहरात विकासात्मक बदल करणे हा माझा राजकीय अजेंडा नसून पॅशन आहे, असे राज ठाकरे म्हणाले.
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com