अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- पारनेर विधानसभेतील आपल्या पराभवानंतर तालुका ओस पडेल, उघडा पडेल हे शल्य काशिनाथ दाते यांना जिल्हा परिषदेत सभापतिपदाची संधी मिळाल्याने दूर झाल्याचे माजी आमदार विजय औटी यांनी सांगितले. दाते यांची सभापतिपदी बिनविरोध निवड झाल्यानंतर पारनेर येथे त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी औटी बोलत होते.
माजी पं. स. सभापती जयश्री औटी, सभापती गणेश शेळके, रामदास भोसले, शिवसेनेचे तालुकाप्रमुख विकास रोहोकले, डॉ. श्रीकांत पठारे, नगराध्यक्ष वर्षा नगरे, उमा बोरूडे, विजय डोळ, गंगाराम बेलकर यांच्यासह शिवसैनिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणी कितीही बिघडवण्याचा प्रयत्न केला, तरी ते मी मोडूनच काढतो, मी फारसा बोलत नाही. दाते यांना सभापतिपदावर बसवून मी करून दाखवणारा माणूस असल्याचे सांगून औटी म्हणाले, पक्षाने आदेश देऊनही सभापतिपदाच्या निवडीत बिघडवण्याचा प्रयत्न झाला.
मतदानाची वेळ आली असती, तरीही दाते निवडून येतील अशी आपण व्यवस्था केली होती, परंतु ती वेळ आली नाही. दाते यांचे हे यश संपूर्ण तालुक्याचे असून ते तालुक्याला झुकते माप देतील, अशी अपेक्षा औटी यांनी व्यक्त केली.
विधानसभा निवडणूकीतील अनपेक्षित पराभवाच्या गर्तेत सापडलेले कार्यकर्ते दाते यांच्या या पदामुळे चार्ज होतील, पुन्हा जोमाने कामास लागतील. तालुका ओस पडेल, उघडा पडेल ही भीती कार्यकर्त्यांमध्ये होती, ती दाते यांनी दूर केल्याचे औटी यांनी सांगितले.
सभापतिपदी वर्णी लागावी, यासाठी जयश्री औटी यांच्या शुभेच्छा होत्या, असे सांगताना दाते हे भाऊक झाले. आयुष्यातील बरीच वर्षे वाया गेली. समाजात काम करताना पदाची फारशी संधी मिळाली नाही. जनतेशी संबंधित पदाने कायम हुलकावणी दिली. महत्त्वाकांक्षेपायी धरसोड केली, परंतु चुका सुधारून पुन्हा काम सुरू केल्याने या पदाची संधी मिळाली, असे दाते म्हणाले.