६ जानेवारी २०२५ ठाणे : मी निवडणुकीपूर्वीच सांगितले होते की, महायुतीचे २०० आमदार निवडून आणू नाहीतर शेती करायला जाऊ. त्यानुसार, आम्ही २०० हून अधिक उमदेवार निवडून आणले आहेत, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे केले.
टेंभीनाका येथील आनंद आश्रमात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नवी मुंबईचे माजी जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर यांच्यासह नाशिक, धुळे, पालघर, शहापूर येथील विविध पदाधिकारी, माजी नगराध्यक्ष, नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. या पक्षप्रवेशानंतर पत्रकारांशी शिंदे यांनी संवाद साधला.
ते पुढे म्हणाले,आज मोठ्या संख्येने अनेकांनी शिवसेनेत प्रवेश केला.यात नवी मुंबई, पालघर मुरबाड, नाशिक, धुळे आदी भागातील विविध पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा समावेश आहे.आम्ही शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन पुढे जात आहोत.
मागील अडीच वर्षांत अनेक विकासाची कामे केली.आज जनतेच्या न्यायालयात खरी शिवसेना आणि धनुष्यबाण कोणाचे, यावर शिक्कमोर्तब झाला आहे,असे त्यांनी सांगितले.प्रत्येक जिल्हा, तालुक्यातून शिवसैनिक येत आहेत.त्यांचे मनापासून स्वागत करतो.
शिवसेना पक्षवाढीसाठी हे सगळे माझ्या सोबत आले आहेत.अडीच वर्षे शिव्याशाप देणाऱ्यांची तोंडे महाराष्ट्रातल्या जनतेने बंद केली. जनतेच्या न्यायालयात गेल्यावर घरी बसणाऱ्यांना कायमच घरी बसवले आहे.आज ज्यांनी प्रवेश केला आहे,असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले