अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2022 :- शिवसेनेचे खासदास संजय राऊत यांनी महात्मा गांधी यांचा मारेकरी नथुराम गोडसे आणि हिंदुत्त्ववादवर आज रोखठोक विधान केलं आहे.
नथुराम गोडसे हा खरा हिंदुत्ववादी असता तर त्याने महात्मा गांधी यांच्याऐवजी मोहम्मद अली जिना यांच्यावर गोळी झाडली असती, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले.
ते मुंबईत प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. “जर कुणी खरा हिंदुत्ववादी असता तर त्यानं जिन्नांना गोळी घातली असती. गांधींना का मारलं?. जिन्नांनी पाकिस्तानची मागणी केली होती.
ज्यांनी देशाचं विभाजन केलं आणि पाकिस्तानची मागणी केली म्हणजेच जिन्ना यांना गोळी घातली पाहिजे होती. जर तुमच्यात हिंमत होती तर जिन्ना यांना गोळी घातली असती.
ते एक देशभक्तीपर कृत्य ठरलं असतं. एका फकिराला गोळी घालणं ठिक नव्हतं. त्यांच्यावरील हल्ल्याचा आज जगभरात निषेध होतो. त्याचं दु:ख आज संपूर्ण जगाला आहे”, असं संजय राऊत म्हणाले.
आम्हीही अनेकदा महात्मा गांधी यांच्या भूमिकेवर टीका केली आहे. पण महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व केले होते. त्यांनी भारतीयांमध्ये कायदेभंग, सत्याग्रह आणि अहिसेंच्या माध्यमातून लढण्याचा विश्वास जागृत केला.
स्वातंत्र्यलढ्यात क्रांतिकारकांचे योगदान आहे. आम्ही नेताजी सुभाषचंद्र बोस, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि भगतसिंग यांचे योगदान नाकारत नाही, असेही संजय राऊत यांनी म्हटले.