अकोले : अहमदनगर जिल्हा बॅँकेचा देशासह राज्यात लौकीक आहे. शेतकरी व ठेवीदारांच्या विश्वासावर आजवर बॅँकेने यशस्वी वाटचाल केली आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी बॅँकेत झालेली नोकरभरती शासन व उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अधीन राहून झाली आहे; मात्र काही लोक या भरतीविषयी गैरसमज पसरवत आहेत.
बॅँकेला बदनाम करणाऱ्या अशा लोकांविरोधात न्यायालयात जाणार असल्याची माहिती बॅँकेचे अध्यक्ष सिताराम पाटील गायकर यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
गायकर म्हणाले, जिल्हा बॅँकेच्या ४६५ जागांकरीता भरती प्रक्रिया राबविली गेली होती. यासाठी सहकार आयुक्तांची मान्यता घेण्यात आली होती.
याला काही लोकांनी हरकत घेतल्यावर विभागीय सहनिबंधकांनी भरती प्रक्रियेला स्थगिती दिली होती; मात्र या आदेशाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली.
त्यानंतर खंडपीठाने सहनिबंधकांचा आदेश रद्द ठरवत बॅँक प्रशासन व नियुक्ती दिलेल्या पात्र उमेदवारांच्या बाजुने निकाल दिला होता. त्यानुसार ६४ उमेदवार वगळता अन्य उमेदवारांना नियुक्तीपत्रे देऊन कामावर हजर करण्यात आले.
राहिलेल्या ६४ उमेदवारांच्या कागदपत्रांची फेरतपासणी विभागीय सहनिबंधकांच्या समितीने केली. त्यात समितीने ६० उमेदवारांना नियुक्ती देण्यासंदर्भात कळविले.
तर राहिलेल्या चार उमेदवारांना नियुक्ती न देण्यास सांगितले. त्यानुसार या जागा अद्यापही भरल्या नाहीत. जिल्हा बॅँकेमुळे शेतकरी व ग्रामीण भागाच्या विकासाला हातभार लागला आहे.
बॅँकेच्या एकूण ७ हजार कोटींच्या ठेवी आहेत, तर ५ हजार कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे. बॅँकेस ३७ कोटी रुपयांचा नफा झाला आहे.
शासनाच्या कर्जमाफी योजनेत महाराष्ट्रात अहमदनगर जिल्हा बॅँकेला सर्वाधिक कर्जमाफीची रक्कम मिळाली आहे. कर्जमाफीचे काम अतीशय जलद गतीने केल्याने बॅँकेचे विविध स्तरांतून कौतूक होत आहे.
तरीही काही लोक माध्यमांना चुकीची माहिती देत गैरसमज निर्माण करीत आहेत. अशा लोकांविरोधात बॅँक न्यायालयात जाणार आहे, असे गायकर यांनी शेवटी सांगितले.