अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2021 :- कोरोना लसीकरणासोबतच राजकारणही तापले असून काँग्रेस नेते मनीष तिवारी यांनी लसींच्या मंजुरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच स्वदेशी लस जर सुरक्षित आहे, तर केंद्र सरकारचे मंत्री ही लस का घेत नाहीत, असा सवालही त्यांनी विचारला.
कोरोनाविरोधी लढ्यात ही लस म्हणजे संजीवनी असल्याचा दावा करणाऱ्या केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी लसीवरील विरोधकांचे आक्षेप खोडून काढले. मनीष तिवारी यांनी आपत्कालीन मंजुरी धोरणाचा मुद्दा मांडला. भारताकडे लसीच्या आपत्कालीन वापराला मंजुरी देण्यासाठीचा धोरणात्मक आराखडाच नाही.
तरीदेखील दोन लसींना मंजुरी देण्यात आली, हे विचित्र आहे. स्वदेशी कोव्हॅक्सिनची तर कहाणीच वेगळी आहे. या लसीला निर्धारित प्रक्रियेविनाच मंजुरी देण्यात आली, अशी टीका तिवारी यांनी केली. ज्या देशांमध्ये लसीकरण सुरू झाले, तेथील नेत्यांनी सर्वप्रथम लस घेतली.
अमेरिकेत नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांनी लस घेतली. ब्रिटनमध्ये पंतप्रधान बोरिस जॉन्सन आणि महाराणी एलिझाबेथ यांनी लस घेतली. देशवासीयांच्या मनात लसीबद्दल विश्वास निर्माण करण्यासाठी या नेत्यांनी पुढाकार घेतला. आपल्या देशात सरकारमधील नेते लस का घेत नाहीत, असा प्रश्न काँग्रेस नेत्यांनी उपस्थित केला आहे.