राज्यकर्त्यांचा कारभार सुधारला नाही तर जानेवारी महिन्यापासून पुन्हा कोयता बंद

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 15 नोव्हेंबर 2020 :-ऊसतोड कामगारांना माणूस म्हणून जगवण्याची गरज अाहे. या मजुरांना कमीत कमी चारशे रुपये रोजंदारी येण्यासाठी ८५ टक्के भाववाढ करावी.

येत्या डिसेंबरअखेरपर्यंत मुदत देऊ, परंतु साखर कारखानदार व राज्यकर्त्यांचा कारभार सुधारला नाही तर जानेवारी महिन्यापासून पुन्हा कोयता बंद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भाजपचे आमदार सुरेश धस यांनी दिला आहे.

आमदार धस यांनी ऊसतोड कामगारांच्या फडात जाऊन दिवाळी साजरी केली. विघ्नहर साखर कारखाना, भीमाशंकर कारखाना, पराग कारखाना, सोमेश्वर कारखाना, साखरवाडी कारखाना, माळेगाव कारखाना,

भवानीनगर कारखाना या कारखान्याचे फड व स्थळाच्या ठिकाणी आमदार धस यांनी भेटी दिल्या. पुणे जिल्ह्यातील घोडगंगा येथील सहकारी कारखान्यावर जाऊन त्यांनी ऊसतोड कामगारांशी संवाद साधला.

या वेळी त्यांच्यासोबत गोपीनाथराव मुंडे ऊसतोड मजूर मुकादम वाहतूकदार संघटनेचे सचिव सुखदेव सानप उपस्थित होते. या वेळी अामदार धस म्हणाले, कारखानदारांनो, आपण जाणते आहात, आमची विनंती मान्य करा.

ऊसतोड मजुरांच्या जीवनात दिवाळी नाही, पाडवा नाही, भाऊबीज नाही. त्यांना त्यांच्या मेहनतीचे पैसे योग्य पद्धतीने दिले पाहिजेत. मुकादमाकडून घेतलेली उचल फिरली पाहिजे.

त्यासाठी सध्याचे भाव काही कामाचे नाहीत. उचल फिटण्यासाठी ८५ टक्के भाववाढ मिळाली पाहिजे. कोयता बंद झाल्यास दोघांचेही नुकसान करू नका.

मजुरांचे आरोग्य महिला-भगिनींची प्रतिष्ठा राखण्यासाठी साखर कारखाना परिसरात सार्वजनिक शौचालये नाहीत. तसेच ऊसतोड कामगार महिलांची रक्तातील हिमोग्लोबिन तपासणी करण्यात येत नाही.

आजारी महिलादेखील रात्रंदिवस काम करत आहेत. त्यांच्या जीवनात एक वेळदेखील ताजे शिजलेले अन्न मिळत नाही. रात्रीचे शिळे अन्न दुसऱ्या दिवशी दिवसभर खावे लागते आहे.

त्यामुळे ८५ टक्के भाववाढ मिळालीच पाहिजे, अन्यथा जानेवारीत पुन्हा कोयता बंद ठेवण्यासाठी आपण सज्ज राहावे, असे आवाहनही आमदार धस यांनी या वेळी केले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24