Marathi News : सत्ता संपादनाच्या खटाटोपातून वेळ मिळाला असल्यास नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांना द्यावी अशी मागणी भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाचे जिल्हाध्यक्ष सुधीर भद्रे यांनी शासनाकडे केली आहे.
खरीप हंगाम २०२२ मध्ये सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यात मूग, बाजरी, उडीद, सोयाबीन, मका, कापूस, तूर, कांदा आणि फुल शेती व फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. शेतकऱ्यांच्या शेतीच्या झालेल्या नुकसानीची भरपाई मिळण्यासाठी भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाने चिचोंडी पाटील येथील ग्रामपंचायत कार्यालयापासून तलाठी कार्यालयापर्यंत शेतकऱ्यांचा मोर्चा काढला होता.
शासनाने तदनंतर पंचनामे तातडीने केले मात्र नुकसान भरपाई देण्यासाठी टाळाटाळ केल्यामुळे जनआंदोलनाने ३१ डिसेंबर २०२२ ची रात्र जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगरसमोर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जागून काढली. मात्र शासनाला दुसऱ्याची सत्ता काढून स्वतःची सत्ता आणण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वेळ खर्ची घालावा लागल्यामुळे अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईचे भान राहिले नाही.
त्यामुळे १९ मे रोजी तलाठी व मंडळाधिकारी कार्यालय चिचोंडी पाटील येथे आंदोलन करण्यात आले. मुख्यमंत्री यांच्यासोबतच पालकमंत्री हे सुद्धा आठ दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होतील असे म्हणतात मात्र आता आठ महिने उलटूनही शेतकऱ्यांना ढबू मिळालेला नाही.
विशेष म्हणजे पुन्हा दुष्काळी परिस्थिती उद्भवली आहे. काही ठिकाणी अजिबात पाऊस नाही तर काही ठिकाणी दुबार पेरणीची वेळ आली आहे. यामुळे सत्ता संपादनाच्या खटाटोपातून वेळ मिळाला असल्यास अहमदनगर जिल्ह्याच्या १४ तालुक्यातील सुमारे सात लाख शेतकऱ्यांचे साडेचार लाख हजार हेक्टर क्षेत्रावरील बाधित झालेल्या पीक नुकसानीचे पैसे तातडीने द्यावेत अशी मागणी अॅड.कारभारी गवळी, राज्य सचिव अशोक सब्बन, वीर बहादुर प्रजापती, सुनील टाक व जिल्हाध्यक्ष भद्रे यांनी केली आहे.