अहमदनगर Live24 ,26 मे 2020 :-कुकडी लाभक्षेत्रातील श्रीगोंदे व इतर शेवटच्या भागात उशिरा पाऊस पडतो. ही बाब लक्षात घेऊन पाणी टंचाई दूर करण्यासाठी कुकडी डाव्या कालव्यातून उन्हाळी हंगामाचे आवर्तन तातडीने सोडावे.
कोरोनाच्या संकट काळात शांत बसावे लागत आहे. म्हणून आम्ही अन्याय सहन करू शकत नाही. आमच्यावर पाण्याच्या बाबतीत पुन्हा अन्याय होणार असेल, तर प्रसंगी रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा माजी मंत्री आमदार बबनराव पाचपुते यांनी दिला.
कुकडीच्या उन्हाळी आवर्तनाबाबत आमदार पाचपुते यांनी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांना पत्र पाठवून शासनाचे लक्ष वेधले. पाचपुते यांनी यात म्हटले आहे की, उन्हाळी हंगामासाठी येडगाव धरणात पुरेसा पाणीसाठा होण्यासाठी डिंभे डावा कालवा सुरू ठेवणे आवश्यक आहे.
माणिकडोह धरणातून नदीद्वारे फीडिंग सुरू करावे. घोड, मीना, कुकडी नदीवरील बंधाऱ्याच्या आवर्तनासाठी एक महिना पुरेल म्हणजे २५ टक्के पाणीपुरवठा करणेबाबत निर्णय घ्यावा.
धरण क्षेत्रात एक जूनला पाऊस सुरू होतो हे गृहीत धरून माणिकडोह धरणातील अर्धा टीएमसी, पिंपळगाव धरणाचे २.५ टीएमसी व डिंभे धरणातून डाव्या कालव्याद्वारे सतत पाणी मिळण्याचे आदेश व्हावे.
तातडीने आवर्तन सुरू झाल्यास पिण्यासाठी पाण्याचे आरक्षण असलेले कुकडी डावा कालव्यावरील सर्व उद््भवांना पाणी उपलब्ध होऊ शकेल.
पिंपळगाव जोगे कालवा यासाठी त्वरित सुरू करावा. त्याशिवाय या धरणातील मृतसाठ्यातील पाणी काढता येणार नाही. उन्हाळी आवर्तन अंत्यत गरजेचे आहे.